पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत बंडाळी आणि पक्षफुटीचा सामना करत आहे. यातच ५९ आमदारांनी वेगळा गट स्थापन केला असून त्यांच्या गटाला विधानसभेत मान्यता देखील मिळाली आहे. त्यानंतर आता २० खासदारही फुटल्याची चर्चा असून त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच तृणमूल काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामा देत पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटी दरम्यान झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे.

टीएमसी पक्ष काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (१२ जून) पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीनंतर सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? याबाबत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला. मात्र, त्या बैठकीत काय चर्चा झाली? याची माहिती आपल्याला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एकतर ती बैठक सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात होती. मी काही त्या बैठकमध्ये नव्हते. त्यामुळे त्या दोघींमध्ये काय चर्चा झाली हे त्यांनाच माहिती असेल. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली, त्याबाबत मला काहीही माहिती नाही. तसेच सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची अद्याप त्या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया येत नाही, तोपर्यंत त्याबाबत मी कसं बोलणार?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दरम्यान, त्या बैठकीचा अर्थ असा होता की ज्या-ज्या पक्षात फूट पडली आहे, अशा परिस्थितीत समविचारी पक्षांनी एकत्र यावं किंवा त्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं अशा प्रकारचा अर्थ लावला जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सूचना आणि भावना मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली, इथपर्यंत मला माहिती आहे. मात्र, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात काय चर्चा झाली? याबाबत मला माहिती नाही. तसेच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसबाबत मला काही वेगळं सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या मी त्याबाबत काही प्रतिक्रिया कशी देणार”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना काय ऑफर दिली?

भाजपाकडून तृणमूल काँग्रेसवर होत असलेल्या राजकीय हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अन्यथा भाजपा आम आदमी पार्टीप्रमाणेच तृणमूल काँग्रेसलाही मोठा त्रास देईल, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज १८’ला सांगितले.

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी न राहता एकत्र काम करण्याची गरज आहे. दोन्ही पक्षांसमोर सध्या अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे परस्पर संघर्ष करण्याऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारणं अधिक योग्य ठरेल, असा सल्ला सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना दिल्याचं सांगितलं जात आहे. जर टीएमसीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यास ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव केले जाईल, अशी ऑफरही सोनिया यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेस आणि टीएमसी यांच्यात संवाद आणि सहकार्याची तयारी वाढल्याचे संकेत मिळत असले, तरी दोन्ही पक्षांमध्ये सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही सक्रिय चर्चा किंवा वाटाघाटी सुरू असल्याचे दिसून येत नाही.

ममतांचा पक्ष काँग्रेसमध्ये खरंच विलीन होईल?

दरम्यना, काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही दोन्ही पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विलीनीकरणाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसकडून येणं गरजेचं आहे. मात्र, आमच्याकडे अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा झाल्यास त्यावर काँग्रेसच्या नेत्यांचेही मत विचारात घेतलं जाईल. सध्यातरी सोनिया गांधी यांनी पक्षातील कोणत्याही नेत्यांना याबाबत कल्पना दिलेली नाही, असं त्यांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ला सांगितलं. दुसरीकडे- तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर गटाचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांनीही विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आमच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदारांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही. मग नेमके कोण कुणामध्ये विलीन होत आहे? आमचे खासदार, आमदार, महापालिकेतील प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.