बुधवारी दुपारी सुमारे १ वाजता उत्तर प्रदेशातील देवरिया येथील २२ वर्षीय सूरज यादवने समुद्रात असलेल्या आपल्या जहाजावरून कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला. व्यावसायिक जहाजावरील आपलं काम आणि राहण्याची व्यवस्था कुटुंबीयांना दाखविताना तो प्रचंड उत्साही होता. ओमानच्या पूर्व किनाऱ्याजवळून हे जहाज भारताच्या दिशेने प्रवास करीत होते. सूरजने कुटुंबीयांना आपण कुठे काम करतो, कुठे झोपतो आणि जहाजावर जेवणाची व्यवस्था कशी आहे, हे व्हिडीओ कॉलवरून दाखवले. मात्र, कॉल संपल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांनी जहाजावर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला आणि या दुर्दैवी घटनेत सूरजचा मृत्यू झाला. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
‘कॉल संपल्यानंतरच हल्ला झाल्याचं कळलं’
मुंबईतील शिपिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूरजच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची दुःखद माहिती दिली. सूरजचे काका अवधेश यादव यांनी सांगितले की, कुटुंबीयांसोबतच शेजारीही सूरजचा व्हिडीओ कॉल पाहत होते.
“संपूर्ण कुटुंब जहाज पाहून खूप आनंदी होतं. आमच्या कुटुंबातून आणि गावातून व्यावसायिक जहाजावर कामासाठी जाणारा सूरज पहिलाच होता. मात्र, कॉल संपल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडल्याचं समजल्यानं आम्हाला मोठा धक्का बसला,” असं अवधेश यांनी सांगितलं.
जहाजावर २८ जण होते
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजता जहाजावरील कर्मचाऱ्यांना क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या घेतल्या. या जहाजावर एकूण २८ जण होते. हल्ल्यात जहाजाचा काही भाग खराब झाला आणि स्फोटातून उडालेला मलबा सूरजच्या डोक्यावर आदळला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ओमानमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ‘एमव्ही केप डाओ’ या व्यापारी जहाजावर बुधवारी हल्ला झाला.
१९ भारतीय खलाशांची सुखरूप सुटका
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, जहाजावरील १९ भारतीय नागरिकांसह सर्व वाचलेल्या कर्मचाऱ्यांची ओमानच्या रॉयल नेव्हीने सुखरूप सुटका केली असून, त्यांना किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. सूरज यादवचा मृतदेह पूर्ण सन्मानाने भारतात आणण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार प्रयत्न करील, असे सोनोवाल यांनी सांगितले.
पहिलीच नोकरी, पहिलाच समुद्री प्रवास
सूरजसाठी ही पहिलीच नोकरी आणि व्यावसायिक जहाजावरील पहिलाच प्रवास होता. त्याने १९ ऑगस्ट रोजी या जहाजावर आपल्या कामाला सुरुवात केली होती. तो जहाजावर ‘वायपर’ म्हणून कार्यरत होता. या कामात इंजिन रूम आणि यंत्रसामग्रीची स्वच्छता राखणे, तसेच इंजिनियर्सना त्यांच्या कामात मदत करणे या जबाबदाऱ्यांचा समावेश असतो.
सूरजला मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्याची इच्छा होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ‘जनरल पर्पज रेटिंग’चा कोर्स केला होता. जानेवारीमध्ये हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला जहाजावर काम करण्याची संधी मिळाली होती. सूरज तीन भावांमध्ये सर्वांत मोठा होता. त्याचे वडील ओम प्रकाश यादव तीन महिन्यांपासून कुवेतमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत आहेत. तर, त्याचे १२ आणि नऊ वर्षांचे दोन धाकटे भाऊ आईबरोबर कर्माजीतपूर गावात वास्तव्यास आहेत.
देवरियातील आणखी एका खलाशाचा हल्ल्यात मृत्यू
ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये देवरियातील खलाशाचा मृत्यू होण्याची ही मागील काही महिन्यांतील दुसरी दुर्घटना आहे. जूनमध्ये पलाऊ-ध्वज असलेल्या सेट्टेबेलो या टँकरवर झालेल्या हल्ल्यात देवरियातील शिवानंद चौरसिया यांचा मृत्यू झाला होता.
जुलैमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले झाल्यानंतर संघर्षग्रस्त भागांमध्ये काम करणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा केंद्र सरकारने आढावा घेतला होता. त्यानंतर होर्मुझसारख्या संघर्षग्रस्त भागांमध्ये भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी ‘सीफेअरर-फर्स्ट’ उपक्रम सुरू करण्यात आला.
