Surat Businessman Suicide Friendship Day: ‘फ्रेन्डशीप डे’च्या दिवशीच मित्राला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केल्याची घटना सुरत, गुजरातमधून उघडकीस आली आहे. राजेशभाई कुंजडिया असे या व्यावसायिकाचे नाव असून, ३० जुलै रोजी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. राजेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मित्रांना दिलेल्या पैशांचा आणि त्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या धमक्या व मानसिक तणावाचा उल्लेख केला आहे.
मित्राला दिले होते १४ लाख रुपये
राजेशभाई मूळ गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मोनिया गावचे रहिवासी आहेत. व्यावसायाच्या निमित्ताने ते सुरतमध्ये पत्नी भाविकाबेन आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे व्यावसायात प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे त्यांना व्यावसायासाठी घेतलेल्या मशीन विक्री कराव्या लागल्या, यातून त्यांना १४ लाख रुपये मिळाले होते. काही महिन्यांपूर्वी राजेशभाई यांनी जवळचा मित्र घनश्याम अहिर याला १४ लाख रुपये ऊसने दिले होते. कॅनडाला जाण्यासाठी त्याला पैसे हवे होते असे त्याने राजेशभाई यांना सांगितले. तसेच, वेळेत पेैसे माघारी देतो असे आश्वासन देखील दिले.
पैसे न देता मिळाल्या धमक्या
दरम्यान, घनश्याम अहिर याने पैसे माघारी देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर राजेशभाई यांना विविध बँकांत खाती उघडण्यास भाग पाडले. आर्थिक व्यवहारांसाठी या खात्यांचा वापर केला जाईल, असे आश्वासने घनश्यामकडून देण्यात आले. पण, तपासात ही खाती सायबर गुन्हे करण्याच्या उद्देशाने उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. खात्यांच्या वापराबाबत राजेश यांच्या लक्षात आल्यानंतर ते खूपच घाबरले. घनश्याम याने देखील राजेशभाई यांना धमकी देण्यास सुरुवात केली तसेच, राजेश यांच्या नावाने सायबर गुन्हे करण्याची धमकी देऊ लागले.
सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे संपवले जीवन
राजेशभाई यांनी आणखी दोघांना पैसे दिल्याचे तपासात उघड झाले. निकीत आणि दाही अहिर यांना प्रत्येकी २ आणि १.३२ लाख रुपये घेतले होते. असे मिळून त्यांनी एकूण १७.३२ लाख रुपये ऊसने दिले होते. राजेशभाई यांना पैसे परत करण्याऐवजी तिघांनी त्यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. तसेच, “तुझ्याकडे पैसे नसतील तर तू मर”, असे टोचून बोलू लागले. सातत्याने मिळणाऱ्या धमक्या आणि टोमणे यामुळे राजेश हैराण झाले होते. अखेर ३० जुलै रोजी तिन्ही मित्रांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहून राजेशभाई यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, घनश्याम अहिर, निकीत (उर्फ रिकी) आणि दाही अहिर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही सध्या पोलिस कोठडीत असून, अधिक तपास सुरु आहे.
