Daughter Kills Father Cooker Lid Attack: तरुण पिढीमध्ये मोबाइलचे वेड वाढत चालले आहे. लहान मुले आणि तरुण मोबाइलच्या व्यसनामुळे अनेकदा चुकीची पावले उचलतात. सूरतमध्ये मोबाइलच्या हव्यासापोटी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी सतत मोबाइलवर गेम खेळत असते, त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी तिचा फोन जमिनीवर आदळला. यानंतर मुलगी हिंसक झाली आणि तिने वडिलांच्या डोक्यावर कुकरच्या झाकणाने प्रहार केला. तसेच चाकूने पोटात वार केले. या जबर मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुलीला अटक करण्यात आली आहे.

प्रकरण काय?

सूरतमधील कोसाड भागात हे कुटुंब राहत होते. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी मृत रमेश चौहान (वय ५५) हे कामावरून घरी आले. तेव्हा त्यांची पत्नी मंजू यांनी त्यांना लहान मुलीची तक्रार केली. आरोपी मुलगी काजल (वय २२) ही सतत मोबाइलवर गेम खेळत राहते. कामात मदत करत नाही, अशी तक्रार आईने केली. यानंतर खवळलेल्या वडिलांनी मुलीला जाब विचारला. मोबाइल बाजूला ठेवून आईला कामात मदत कर, असे तिला सांगितले.

मुलीने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी मुलीचा मोबाइल हिसकावून जमिनीवर आदळला. यानंतर मुलगी अचानक हिंसक झाली आणि तिने कुकरच्या झाकणाने वडिलांच्या डोक्यावर मारले. त्यानंतर तिने चाकूनेही त्यांच्यावर वार केले. वडिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी मंजू तात्काळ किचनमध्ये धावत आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मंजू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काजलला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जे. बी. वानर यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, मोबाइलवर गेम खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हत्येत झाले. काजलच्या जन्मदात्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मंजू सूरत येथे आल्या आणि त्यांनी रमेश चौहान यांच्याशी विवाह केला होता.

सूरतमधील अमरोली पोलीस ठाण्यात मंजू यांच्या तक्रारीनंतर त्यांच्या मुलीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काजलला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आता या गुन्ह्याचा सखोल तपास करत असून नेमके घरात काय घडले होते, याची उकल केली जात आहे.