करोनाचा इतर व्यवसायांप्रमाणेच गुजरातच्या सुरतमधील जेम्स आणि ज्युवेलरी उद्योगाला देखील मोठा फटका बसला होता. मात्र, करोनातून पुन्हा सावरत हा उद्योग उभारी घेऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत सुरतमधील जेम्स आणि ज्युवेलरी उद्योगाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. मार्च २०२०मध्ये भारतात करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले होते. या काळात सर्व उद्योगधंदे देखील बंद होते. याचा फटका सुरतच्या हिरे व्यापाराला मोठ्या प्रमाणात बसला होता. सुरतमधील उद्योग पुर्णपणे ठप्प झाले होते. तसेच जेम्स अँड ज्युवेलरीची भारताकडून आयात करणारे अनेक देश करोनाच्या संकटाशी सामना करत होते, त्यामुळे करोनाचे निर्बंध हटवल्यानंतरही उद्योग ठप्प होता.

गुजरातमधील जेम्स अँड ज्युवेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश नावडिया यांच्या म्हणण्यानुसार, “२०१९-२० मध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान निर्यात १४.७६ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. २०२०-२१ मध्ये त्याच काळात ही निर्यात वाढून आता १५.८५ अब्ज डॉलर झाली आहे. “जेम्स अँड ज्युवेलरीची सर्वाधिक मागणी आम्हाला अमेरिका आणि हाँगकाँगकडून होत आहे. २०१९-२० मध्ये एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान निर्यात १४.७६ अब्ज डॉलर्स होती, ती आता वाढली आहे. जेम्स अँड ज्युवेलरीच्या निर्यातीत ७.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे,” असं ते म्हणाले.

दुसऱ्या देशांकडून जेम्स अँड ज्युवेलरीची मागणी वाढल्याने सुरतमधील आर्थिक उलाढाल वाढली आहे.