सुरत या ठिकाणी आई वडिलांसह रेस्तराँमध्ये जेवायला गेलेल्या पाच वर्षांच्या मुलीचा रुग्णालयात दाखल करताच मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी रेस्तराँमधल्या अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्या असं मृत मुलीचं नाव आहे. तिला पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र अवघ्या १५ ते २० मिनिटांत तिचा मृत्यू झाला.
सुरतमध्ये घडलेली घटना काय?
सुरत या ठिकाणी वास्तव्य करणारं कुटुंब रेस्तराँमध्ये जेवायला गेलं होतं. तिथे त्यांनी काजू पनीर करी मागवली. ही करी खाल्ल्यानंतर पाचही जणांची प्रकृती बिघडली. पाचही जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या पाच जणांमध्ये पाच वर्षांच्या आर्या या मुलीचा समावेश होता. पाच वर्षांच्या आर्याचा या घटनेत मृत्यू झाला.
कुटुंबीयांना त्रास कधी सुरु झाला?
आर्या या मुलीचा काजू पनीर करी खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. आर्या आणि तिचं कुटुंब सुरतमधल्या रंजुआधाम सोसायटीत वास्तव्य करतं. ते जेवणासाठी सुरत येथील शीतर रेस्तराँमध्ये गेले होते. जेवण करुन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास या कुटुंबाला त्रास होऊ लागला. अशोक कलसरिया आणि त्याच्या मुलीला आधी त्रास झाला. त्यानंतर त्यांनी ९ वाजता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली तोपर्यंत या दोघांचा त्रास आणखी वाढला होता. यानंतर आणखी कुटुंबीयांची प्रकृतीही बिघडली. पाचही जाणांना सुरतमधल्या सद्विचार रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. या ठिकाणी दाखल केल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत आर्याचा मृत्यू झाला. तिला अतिदक्षता विभागात नेण्यात आलं होतं असं तिच्या कुटुंबाने सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अशोकभाई, त्यांची पत्नी आणि दोन मुलींवर उपचार सुरु आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
गुजरात सरकारने घेतली प्रकरणाची दखल
या प्रकरणाची दखल गुजरात सरकारने घेतली आहे. गुजरातच्या आरोग्य मंक्ष्यांनी या प्रकरणी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन बैठक घेतलं आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच शीतल रेस्तराँ हे तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि नेमकं काय घडलं त्याचा अहवाल सादर करा असेही आदेश देण्यात आले आहेत.
