Jain Muni Chandra Sagar Obscene Video: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना गुजरातमध्ये एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका जैन मुनीचा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जैन समुदायाच्या महिलांनी त्याच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांच्याकडे महिलांनी तक्रार अर्ज सादर करत जैन भिक्षू चंद्र सागर मुनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, चंद्र सागर मुनी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महिलांकडून तक्रार दाखल

जैन समुदायाच्या महिलांनी २९ मार्च रोजी याबाबत सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांच्याकडे अर्ज सादर केला. “हा अश्लील प्रकार बऱ्याच वेळापासून सुरु असल्याचा दावा त्यांनी तक्रार अर्जात केला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी”, अशी मागणी या महिलांनी या अर्जाच्या माध्यमातून केली आहे. यामुळे जैन समुदायाची बदनामी होत असल्याचेही त्यांनी अर्जात म्हटले आहे.

महिलांची मागणी काय?

“अश्लील कृत्य करणाऱ्या जैन मुनी चंद्र सागर यांना तत्काळ हटवावे अशी आमची मागणी आहे”, असे महिलांनी म्हटले आहे. मुनीच्या वेशात एक व्यक्ती अश्लील कृत्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांनी केलेल्या या आरोपांना जैन मुनी चंद्र सागर यांनी उत्तर दिले आहे. चंद्र सागर यांनी महिलांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत मांडले.

जैन मुनी चंद्र सागर यांनी काय म्हटले?

“काही लोक माझ्याविरोधात अफवा पसरवत आहेत. काही महिला तक्रार घेऊन पोलिसांकडे गेल्याचेही मला समजले. महिलांनी केलेल्या आरोपांची त्यांना कल्पना तरी आहे का? त्या मला कधी भेटल्या आहेत?”, असा सवाल चंद्र सागर यांनी उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. पण, जैन मुनीचे कथित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.