Man killed his dietitian wife : क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी एक भयानक घटना सुरतमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह चक्क सिमेंटच्या पेटीत बंद करून ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा हा प्रयत्न अत्यंत धक्कादायक होता. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने ती बेपत्ता असल्याचे भासवले, पण मुलामुळे या हत्येचा उलगडा झाला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार
विशाल साल्वी (४०) असे आरोपीचे नाव असून त्याने आपली पत्नी शिल्पा साल्वी (३९) बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. शिल्पा व्यवसायाने आहारतज्ज्ञ (डाएटिशियन) होती. ४० वर्षीय विशालने दावा केला होता की, शिल्पा चार दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू केला, मात्र तपासाला वेग येताच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
तपासादरम्यान सापडली चिठ्ठी
तपासादरम्यान पती विशालने लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या अल्पवयीन मुलाला घरात सापडली. या मुलाने ही चिठ्ठी पोलिसांना दिली. या चिठ्ठीत विशालने “आपल्याकडून मोठी चूक झाली असून शिल्पा आता जिवंत नाही,” अशी कबुलीवजा ओळ लिहिली होती. या चिठ्ठीमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
तपासाच्या आधारे पोलिसांनी सलाबतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशालच्या एका जुन्या बंद घराचा शोध घेतला. घराचा दरवाजा तोडून आत शिरल्यावर पोलिसांना एका लाकडी पेटीतून उग्र वास येत असल्याचे जाणवले. ही पेटी घराच्या एका कोपऱ्यात ठेवली होती. पेटी उघडली असता त्यात शिल्पाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. आरोपीने मृतदेहावर सिमेंट टाकून तो लपवण्याचा प्रयत्न केला होता.
प्राथमिक अंदाजानुसार, बेपत्ता असल्याची तक्रार करण्याच्या ४-५ दिवस आधीच ही हत्या करण्यात आली असावी. वरिष्ठ पोलीस अधिकारी कानन देसाई यांनी सांगितले की, कौटुंबिक कलह आणि पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या आरोपी विशाल साळवी फरार असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत.
