गुजरातमधील सुरत शहरातून अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळणे थांबवून गृहपाठ पूर्ण करण्यास पालकांनी सांगितल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा व्हिडिओ गेमच्या आहारी गेला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम आणि मोबाइल हाताळण्याच्या सवयीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
गृहपाठावरून पालकांनी केली समजूत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना घडली. मुलाचे वडील अमरसिंग निशाद यांनी मुलाला बराच वेळ मोबाइलमध्ये गुंतलेले पाहिले. त्यांनी त्याला अनेकदा व्हिडिओ गेम बंद करून गृहपाठ पूर्ण करण्यास सांगितले. मात्र मुलाने त्याकडे दुर्लक्ष करून गेम खेळणे सुरूच ठेवले. यामुळे वडील मुलाला ओरडले. त्यानंतर मुलाने मोबाइल आईकडे दिला आणि घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला.
काही वेळानंतर रात्रीच्या जेवणासाठी वडिलांनी मुलाला आवाज दिला, मात्र आतून मुलाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. सर्वांनी मिळून दरवाजा उघडला असता त्यांना मुलाने गळफास घेतला असल्याचं कळलं. कुटुंबीयांनी तातडीने त्याला न्यू सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
व्हिडिओ गेमचे व्यसन असल्याचा दावा
चौक बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युतिका कौशिक यांनी सांगितले की, मुलगा दांपत्याचा एकुलता एक मुलगा होता आणि तो विड रोड परिसरातील सुरत महानगरपालिकेच्या शाळेत सातवीत शिकत होता. शाळेकडून तो नियमित गृहपाठ करत नसल्याच्या तक्रारी पालकांना मिळाल्या होत्या. प्राथमिक चौकशीत मुलाला मोबाइलवरील व्हिडिओ गेमचे व्यसन लागल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितलं.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मुलाच्या पालकांसह शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. घटनेमागील सर्व परिस्थितीचा तपास सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मुलाचे वडील मूळचे ओडिशाचे असून ते सुरतमधील पॉवरलूम कारखान्यात काम करतात. हे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून सुरतमध्ये वास्तव्यास आहे.
