सुरतमध्ये २०२२ मध्ये झालेल्या तीन हत्यांचा धक्कादायक प्रकार तब्बल चार वर्षांनंतर समोर आला आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर तिच्यावरच हत्येचा आरोप ठेवण्यासाठी पतीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. मात्र, या माहितीची चौकशी करताना पोलिसांना त्याच दाम्पत्याचा तीन हत्यांशी संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी माधवदास भक्तिराम साधू आणि त्याची विभक्त पत्नी उर्मिला ऊर्फ जया माधवदास साधू यांच्यावर तीन जणांच्या हत्येप्रकरणी कारवाई केली आहे. मृतांमध्ये उर्मिलाची आजी शांता वसावा, तिची बहीण भगवती वसावा आणि माधवदासची आई मंजुळा साधू यांचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
पोलिसांना मिळाली खोटी माहिती
अहमदाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा डिटेक्शन युनिटला माहिती मिळाली की, २०२२ मध्ये सुरतमधील कोसंबा येथे शांता वसावा यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा मृतदेह घरात पुरण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि उर्मिलाच्या एका पुरुष नातेवाईकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र चौकशीत त्याचा या हत्येशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. या प्रकरणानंतर पोलिसांना गुन्ह्याची खबर देणाऱ्या व्यक्तीबद्दलच संशय येऊ लागला. सखोल तपासात ही खबर देणारी व्यक्ती अन्य कोणी नसून माधवदास असल्याचे उघडकीस आले.
पत्नीला अडकवण्यासाठी रचला बनाव?
पोलिसांच्या चौकशीत माधवदासच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्या. त्यानंतर केलेल्या तपासात शांता वसावा यांच्या हत्येत माधवदास आणि उर्मिला दोघांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांच्या मते, स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी माधवदासने पोलिसांना खोटी माहिती दिली आणि उर्मिला तसेच तिच्या नातेवाईकाला या हत्येत अडकवण्याचा प्रयत्न केला.
आठ महिन्यांपासून दोघे राहत होते वेगळे
तपासात या हत्यांमागे नेमका हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माधवदास आणि उर्मिला मागील सुमारे आठ महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते. उर्मिला आपल्या मुलासोबत घरातून निघून गेली होती. तिने जाताना दागिने आणि रोख रक्कमही बरोबर नेल्याने माधवदास तिच्यावर नाराज होता. या रागातूनच पत्नीला गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्याने खोटी कहाणी रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
आजीचा मृतदेह सिमेंटच्या ड्रममध्ये पुरला
पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये शांता वसावा यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह एका ड्रममध्ये टाकला होता. त्यानंतर त्या ड्रममध्ये सिमेंट भरून तो मृतदेह एका खड्ड्यात पुरण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आता तो पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला असून, या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.

आजारी बहिणीचीही हत्या केल्याचा आरोप
माधवदास आणि उर्मिला यांची कसून चौकशी केल्यानंतर आणखी दोन हत्येचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील एक मृत महिला भगवती कमलेश वसावा ही असून, ती आरोपी उर्मिलाचीच बहीण होती. तिला क्षयरोगाचा आजार होता, अशी माहिती पोलिसांनी तपासादरम्यान दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दाम्पत्याने भगवतीच्या तोंडावर उशी दाबून तिची निघृण हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह देखील लपवण्यासाठी जमिनीत पुरून टाकला.
माधवदासच्या आईचीही हत्या
या गुन्ह्यातील दुसरी बळी ठरलेली महिला मंजुळा भक्तिराम साधू ही माधवदासची आई आणि उर्मिलाची सासू होती, तिला अर्धांगवायूचा गंभीर आजार होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी दाम्पत्याने मंजुळा यांच्याही तोंडावर उशी दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर खुनाचा छडा लागू नये यासाठी त्यांच्या मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार उरकून टाकल्याचे तपासात उघड झाले आहे.
दरम्यान, या तिन्ही हत्यांमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात उपलब्ध पुरावे, मृतदेह आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
