पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्याला लष्कराकडून बक्षिस मिळाले असून, लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांना बढती देण्यात आली आहे. सतीश दुआ यांची चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
सतीश दुआ यांनी ३१ ऑक्टोबर रोजीच औपचारिकपणे या पदाचा कार्यभार सांभाळला. पण गुरुवारी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दुआ यांनी नवी दिल्लीतील अमर जवान ज्योती येथे जाऊन शहीदांना श्रद्धांजलीही अर्पण केली. या पदाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी दुआ यांच्याकडे चिनार कोअरचे प्रमुख पद होते. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी याच कोअरकडे असते. त्यामुळे लष्करामध्ये या कोअरला विशेष महत्त्व आहे. गेल्या वर्षी २७ ऑगस्टला त्यांच्याकडे चिनार कोअरचे प्रमुखपद देण्यात आले होते. या कार्यकाळात त्यांनी नियंत्रण रेषेवर विविध कारवाया करून दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याचबरोबर दगडांचा सहारा घेऊन दहशतवादी कशा पद्धतीने भारतीय जवानांवर हल्ला करतात, याचा खुलासाही त्यांनी केला होता.
आपल्या ३७ वर्षांच्या सेवेमध्ये सतीश दुआ यांनी लष्करामध्ये विविध पदांवर काम केले आहे. पण सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च म्हणता येईल. उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या अड्डयांवर हल्ला चढवला होता. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. भारतात घुसखोरी करण्याचे या दहशतवाद्यांचे मनसुबेच आपल्या जवानांनी उधळून लावले आणि त्यांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कराच्या या कृतीचे सर्वच भारतीयांना मनापासून स्वागत केले होते. सतीश दुआ हे १९७९ मध्ये जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून लष्करी सेवेत रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या कर्तबगारीने वेगवेगळ्या पदांवर उल्लेखनीय कार्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surgical strikes lt gen satish dua promoted to chief of integrated defence staff
First published on: 04-11-2016 at 16:25 IST