Dahgram Angarpota Bangladesh Enclave Inside India: चारही बाजूंनी भारताच्या जमिनीने वेढलेले गाव सध्या चर्चेत आहे. भारताच्या भूभागावर असलेल्या गावांमध्ये भारतीय कायदा, भारतीय राष्ट्रध्वज आणि भारतीय चलन वापरायला हवे. मात्र एक गाव असे आहे, जिथे शेजारच्या बांगलादेशचे कायदे, चलन आणि संस्कृती पाळली जाते. अर्थातच हे गाव पश्चिम बंगालमध्ये आहे. मात्र चारही बाजूंनी भारतीय भूभाग असताना हे गाव बांगलादेशचे कसे काय झाले? याबाबत माहिती जाणून घेऊ. मॅप यात्रा या इन्स्टाग्राम हँडलवर गावाची माहिती देणारा एक व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे.

या गावाचे नाव दहग्राम-अंगरपोटा असे आहे. हे गाव पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात येत असले तरी त्याला बांगलादेशी वस्ती म्हणून ओळखले जाते. या गावात सुमारे २० हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिक राहतात. पूर्णपणे भारताच्या हद्दीत असूनही इथे बांगलादेशचे नियम पाळले जातात. या गावात प्रवेशावर बंदी असल्यामुळे सीमेवरील वेगळेपण म्हणून हे गाव ओळखले जाते.

अजब भौगोलिक रचना

दहग्राम-अंगरपोटा गावाचे क्षेत्रफळ १८.५ चौरस किमी आहे. गाव चारही बाजूंनी भारतीय हद्दीने वेढलेले आहे. या गावातील लोक भारतीय रुपया नाही तर बांगलादेशी चलन वापरतात. बांगलादेशी ध्वज फडकवतात आणि बांगलादेशच्या नागरी सुविधांवर अवलंबून असतात.

या गावातील रहिवासी बांगलादेशी मोबाइल नेटवर्कचा वापर करतात. त्यांचे दैनंदिन जीवन, भाषा आणि संस्कृती बांगलादेशशी जोडलेली आहे.

गावाचा इतिहास काय?

१९९२ पर्यंत या गावातील जीवन अतिशय खडतर होते. बांगलादेशची सीमा या गावापासून अवघ्या १७८ मीटर अंतरावर आहे. मात्र बांगलादेशला जोडणारा अधिकृत मार्ग नसल्यामुळे रहिवाशांना भारताच्या परवानगीशिवाय बांगलादेशमध्ये ये-जा करता येत नव्हती. तसेच मूलभूत सुविधाही मर्यादित होत्या.

अनेक वर्षांपासून या गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी संघर्ष करावा लागत होता. यामुळे या गावाला खुले तुरुंग असल्याचे संबोधले जात होते.

Tinbigha corridor
बांगलादेश आणि theflyinggirlbd

तीन बिघा कॉरिडॉरमुळे परिस्थिती बदलली

भारत आणि बांगलादेशमध्ये १९७४ साली झालेल्या करारानुसार भारताने ‘तीन बिघा कॉरिडॉर’द्वारे बांगलादेशला १७८ मीटर लांब आणि ८५ मीटर रुंद असलेला पट्टा भाडेपट्ट्यावर देण्याचे मान्य केले. या पट्ट्यामुळे दहग्राम-अंगरपोटा गाव बांगलादेशला जोडले गेले.

सुरुवातीच्या काळात हा मार्ग दररोज केवळ १२ तासांसाठी खुला ठेवला जात होता. रस्त्याचे गेट बंद होण्यापूर्वी कुणी पलीकडे जाऊ शकले नाही तर त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावे लागत होते. २०११ मध्ये, भारताने हा कॉरिडॉर २४ तास खुला ठेवण्यास परवानगी दिली. ज्यामुळे गावातील रहिवाशांचे जगणे सुकर झाले.

पाहा व्हिडीओ –

गावात चालतात बांगलादेशी कायदे

जरी या गावाचा भूभाग भारतीय हद्दीत असला तरी त्याचा दैनंदिन कारभार बांगलादेशी कायद्यांनुसार चालतो. सीमेवरील संवेदनशील ठिकाण असल्यामुळे याठिकाणी सुरक्षा दलाची निगराणी असते. बांगलादेशी नागरिक निर्धास्तपणे या मार्गावरून प्रवास करतात. मात्र पर्यटक आणि इतर भारतीय नागरिकांना याठिकाणी सहज प्रवेश मिळत नाही. त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.

२०१५ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ऐतिहासिक भूसीमा करार झाला. या करारांतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांच्या हद्दीत असलेल्या अनेक भूभागांची अदलाबदल केली. मात्र, या अदलाबदलीतून ‘दहग्राम-अंगरपोटा’ वगळण्यात आले. त्यामुळे आजच्या घडीला भारताच्या हद्दीत उरलेला हा बांगलादेशचा एकमेव आणि सर्वात मोठा भूभाग आहे.