“…म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली”, बिहारमधील राजकीय भूकंपानंतर सुशील मोदींचा मोठा खुलासा

बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे.

“…म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली”, बिहारमधील राजकीय भूकंपानंतर सुशील मोदींचा मोठा खुलासा
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे व सुशील मोदी

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये एक मुलभूत फरक आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपा सत्तेत आली, मात्र बिहारमधील सत्तांतराने भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलंय. या पार्श्वभूमीवर बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे.

सुशील मोदी म्हणाले, “अमित शाहांनी फोन केला तेव्हा त्यांनी आरसीपी सिंह यांचं नाव दिलं. त्यानंतर सिंह यांना मंत्री करण्यात आलं. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाचा कोणता नेता मंत्री होतो यामुळे भाजापाला काहीही फरक पडत नाही. भाजपाने नितीश कुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राजद, काँग्रेससोबत मिळू शकणार नाही. १९९६ पासून पाहिलं तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचं सरकार असो, भाजपाने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला.”

“…तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती”

“नितीश कुमार म्हणतात आमच्या पक्षाला फोडण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी ४० आमदार हवे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपाने फोडलं असतं तरी सरकार स्थापन झालं असतं का? आम्ही का त्यांचा पक्ष फोडू? त्यांच्या ४४-४५ आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला,”

“धोका दिल्याने भाजपाने शिवसेना फोडली”

महाराष्ट्राचं उदाहरण देत सुशील मोदी पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता २०१४, २०१९ पेक्षाही अनेकपट जास्त आहे.”

हेही वाचा : बिहारच्या राजकारणातला वादळी दिवस! राजीनाम्यानंतर बुधवारी पुन्हा नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

“लिहून ठेवा, हे सरकार २०२५ वर्षही पूर्ण करू शकणार नाही”

“त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही. आम्ही बिहारमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ. आज लिहून ठेवा, हे सरकार २०२५ वर्षही पूर्ण करू शकणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल,” असा इशाराही मोदींनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis pbs

Next Story
नेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी