भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमारला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती तर त्याने नक्कीच सुवर्णपदक जिंकलं असतं असा विश्वास योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मायदेशी परतताच सुशीलकुमार आणि सुमीत मलिक यांनी दिल्लीत योगगुरु बाबा रामदेव यांची भेट घेतली.

‘जर त्यावेळी सुशीलकुमार खेळला असता तर एक सुवर्णपदक नक्कीच भारताच्या खात्यात जमा झालं असतं आणि भारताची मानही उंचावली होती’, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. हाच प्रश्न जेव्हा सुशीलकुमारला विचारण्यात आला तेव्हा त्याने सांगितलं की, ‘मला सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे, जेणेकरुन माझ्या कामगिरीत सातत्य राहील. मला अजून खेळायचं आहे आणि भारतासाठी जिंकायचं आहे. मी २०१६ मधील ती गोष्ट आता विसरलो असून, पुढील वाटचालीकडे लक्ष देत आहे. जर ते झालं नसतं तर कदाचित हे पदक मी जिंकलो नसतो’.

बाबा रामदेव यांनी दोन्ही कुस्तीपटूंनी कॉमवेल्थ गेम्समध्ये भारताचा मान वाढवला असून तरुणांसाठी प्रेरणा ठरले आहेत असं म्हटलं आहे. ‘आम्हाला सुशीलकुमारचा अभिमान आहे. सुमीत आणि सुशीलकुमारने भारताची मान उंचावली आहे. तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. जर सुशीलकुमारला त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखलं नसतं तर कदाचित भारताने अजून एक पदक जिंकलेलं असतं’, असं बाबा रामदेव बोलले आहेत.

सुशीलकुमारने ७४ किलो वजनी गटात फ्री स्टाइल कुस्तीत सुवर्णपदक जिंकले. सुशीलकुमारने दक्षिण आफ्रिकेच्या बोथाचा १०-० अशा गुणांनी पराभव केला. अवघ्या ८० सेकंदात सुशीलकुमारने बोथाला चीतपट केलं.