अफजल गुरुला फाशी देण्यापूर्वी सात तारखेला संध्याकाळी स्पीडपोस्टद्वारे त्याच्या कुटुंबियांना कळविले होते. आता ते पत्र त्याला कधी मिळाले, यावर मी सध्या काही बोलू शकणार नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली. अफजलला फाशी दिल्याचे पत्र त्यांच्या कुटुंबियांना सोमवारी सकाळी मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. जम्मू-काश्मीर टपाल विभागातील कर्मचाऱयाने सोमवारी सकाळी अफजलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना कारागृह प्रशासनाचे पत्र दिले. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केंद्र सरकारजी बाजू स्पष्ट केली. 
ते म्हणाले, अफजलला फाशी देण्यापूर्वी कारागृह प्रशासनाने सर्व गोष्टी नियमानुसार पूर्ण केल्या आहेत. शिक्षा सुनावलेल्या कैद्याला फाशी देताना त्याच्या कुटुंबियांना माहिती कळविण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्याची नाही. कारागृहातील अधिकारी हे काम करीत असतात. अफजलच्या घरी सात तारखेला संध्याकाळी दोन वेळा स्पीडपोस्टद्वारे फाशीच्या अमलबजावणीबद्दल कळविण्यात आले आहे. त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही अफजलला फाशी देण्याच्या आदल्यादिवशी त्याबद्दल माहिती दिली होती. काश्मीरमधील परिस्थिती आणि अफजलची फाशी हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे ते एकत्र जोडणे योग्य होणार नाही.
अफजल गुरुचा मृतदेह तिहार कारागृहात जिथे दफन करण्यात आला, तिथे एकदा जाऊ द्यावे, अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यावर सरकार नक्कीच विचार करेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
तेलंगणावर चर्चा सुरू
वेगळ्या तेलंगणाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अजून चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंची मते जाणून घेतली जात आहेत. याबाबत कोणतीही अंतिम तारीख ठरविता येणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
गोपनीयता हवीच
पोलिस, कारागृह यांना काही गोष्टी या गोपनीय ठेवाव्याच लागतात. सर्व व्यवहार खुले ठेवल्यास देश चालणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले.