वृत्तसंस्था, बंगळूरु : कर्नाटकचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला आहे. संतोष पाटील असे या कंत्राटदाराचे नाव आहे. आपण सरकारी ठेक्यांचे काम पूर्ण केल्यानंतर त्याची देयके मंजूर करण्यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री असलेल्या ईश्वरप्पा यांनी आपल्याकडे पैशांची मागणी केली तसेच त्यासाठी सतावणूक केली, असा पाटील यांचा आरोप होता.

उडूपीतील शंभवी हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी पाटील यांनी सरकारी कंत्राटाचे काम पूर्ण केले होते. त्याचे देयक अदा करण्यासाठी ईश्वरप्पा यांनी दलालीची मागणी केली होती, असा पाटील यांचा आरोप होता. आपल्याला काही झाल्यास त्यासाठी ईश्वरप्पा यांना जबाबदार धरण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले होते. पाटील यांनी एक पत्र लिहिले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना देण्यात आली होती, पण आपणास याची काही माहिती नाही, असे बोम्मई यांनी सांगितले.

हिंदू वाहिनीचा पदाधिकारी

पाटील हे स्वत:ची ओळख हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय सचिव अशी सांगत. त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंह यांना पत्र लिहून ईश्वरप्पा हे दलाली मागत असल्याची तक्रार केली होती. पण आपण पाटील यांना ओळखत नाही, असा दावा ईश्वरप्पा यांनी केला होता.