‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन मुंबईतून सलीम खानला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील निवासी असलेल्या सलीमला मुंबई विमानतळावरुन अटक केल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी संयुक्त कारवाई केली. मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी सलीम खान या संशयित दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. सलीमने पाकिस्तानममधील मुजफ्फराबादच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते. सलीमला अटक झाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. सलीम खान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूरचा रहिवासी आहे. सलीम कोणत्या दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता हे अजून समजू शकलेले नाही. सलीमने ‘लष्कर’साठी हेरगिरी करणाऱ्यांना आर्थिक रसद पुरवली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशमधून लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याला अटक झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील एटीएसने उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधून संदीप शर्मा याला अटक केली होती. काश्मिरी तरुणीच्या प्रेमात पडलेल्या संदीपने तरुणीच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन दहशतवादाचा मार्ग स्वीकारला होता. दहशतवाद्यांसाठी कार चालवण्याचे काम तो करायचा. दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि बँक लुटीसारख्या घटनांमध्ये संदीप सहभागी होता. जम्मू- काश्मीर पोलिसांच्या कारवाईतूनच सलीमचा खुलासा झाला होता.