लखनऊ/ गोरखपूर गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात चार वर्षांपूर्वी ७० मुलांचा प्राणवायूच्या कमतरेमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. काफिल खान यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिली. गोरखपूर येथील बीआरडी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २०१७मध्ये ७० मुलांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीत डॉ. काफिल खान दोषी आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव अलोक कुमार यांनी सांगितले. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया डॉ. खान यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही, डॉ. खान यांच्या बडतर्फीचा निर्णय द्वेषमूलक असल्याची टीका केली आहे.