scorecardresearch

VIDEO: ‘मालिश’नंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर, तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

१० मिनिटांचा हा व्हिडीओ १२ सप्टेंबरचा आहे. पलंगावर आराम करत असताना तीन लोकांशी संवाद साधताना जैन या व्हिडीओमध्ये दिसत आहेत

VIDEO: ‘मालिश’नंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर, तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

तुरुंगातील मालिश आणि जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तुरुंगातील सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये जैन पाहुण्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. तिहारचे निलंबित तुरुंग अधीक्षकदेखील या व्हिडीओत जैन यांची भेट घेताना दिसत आहेत. या नव्या व्हिडीओमुळे जैन यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

१० मिनिटांचा हा व्हिडीओ १२ सप्टेंबरचा आहे. पलंगावर आराम करत असताना तीन लोकांशी संवाद साधताना जैन या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. काही मिनिटांनंतर निलंबित तुरुंग अधीक्षक अजित कुमार खोलीत दाखल होताच अन्य लोक बाहेर जाताना या व्हि़डीओत दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमध्ये मालीश घेतानाचा व्हिडीओ जारी केल्यानंतर भाजपाने आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर केला होता. जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्वीट केला होता.

‘मला जेलमध्ये योग्य अन्न मिळत नाही’, सत्येंद्र जैन यांची कोर्टात याचिका, भाजपाने व्हिडीओ शेअर करत केला भांडाफोड, सीसीटीव्ही व्हायरल

“मीडियाकडून अजून एक व्हिडीओ! बलात्काऱ्याकडून मालीश घेतल्यानंतर आणि त्याचा फिजिओ थेरपिस्ट असा उल्लेख केल्यानंतर सत्येंद्र जैन जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवलं जात आहे. केजरीवाल यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हे तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे,” असं ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:53 IST

संबंधित बातम्या