Humayun Kabir on Babri Masjid: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केल्यानंतर आमदार हुमायून कबीर यांची तृणमूल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाने निलंबित केल्यानंतरही हुमायून कबीर यांनी बाबरी मशीद उभारण्याचा चंग बांधला आहे. तीन वर्षांत बाबरी मशीद उभी राहणार असून कोणतीही सत्ता किंवा राजकीय शक्ती हे काम रोखू शकणार नाही, असा इशारा कबीर यांनी दिला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत आव्हान दिले आहे.

हुमायून कबीर म्हणाले, “ही अयोध्या नाही. हे मुर्शिदाबाद आहे. इथे येऊन कुणीही बाबरी मशिदीला हात लावू शकत नाही.”

६४ वर्षीय हुमायून कबीर पुढे म्हणाले, मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद उभारण्याचा त्यांचा निर्णय १९९२ च्या घटनाक्रमाशी निगडित आहे. यावर्षी बाबरीचे पतन झाले होते. तसेच २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने विवादीत जागा राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय घेतला. आम्ही न्यायालयाचा निर्णय स्वीकारला असला तरी बाबरी मशीद इतरत्र बांधली पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला.

माझा बाबरचा काहीही संबंध नाही. लोकांच्या मनात दुःख असल्यामुळे मी या मशिदीला बाबरी असे नाव देत आहे. जर निवडणुकीत जय श्री रामचा नारा देणे योग्य असेल तर मग अल्लाहु अकबर बोलणेही चुकीचे नाही, असेही कबीर म्हणाले.

बाबरी मशिदीसाठी कोट्यवधींचा निधी जमा

निलंबित आमदार हुमायून कबीर म्हणाले की, बाबरीच्या बांधकामासाठी मोठा निधी गोळा झाला आहे. देणगीदारांकडून जवळपास २० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमा झाला आहे. ही रक्कम मशीद बांधण्यासाठी वापरली जाईल. मशिदीसाठी २५ बिघा जमीन घेतली असून कागदपत्रांचे काम सुरू आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी तिथे नमाज अदा केली जाईल, असेही ते म्हणाले.