अमेरिकेतील विस्कॉन्सिन (Wisconsin US) राज्यात शाळकरी मुलं आणि सामान्य नागरिकांचा समावेश असलेल्या एका ख्रिसमस परेडमध्ये भरधाव गाडी घुसल्यानं ५ जणांचा मृत्यू झालाय, तर जवळपास ४० लोक जखमी झालेत. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आलाय. यात एक लाल रंगाची एसयूव्ही कार अचानक गर्दीत येऊन अनेकांना चिरडत जाताना दिसत आहे. त्या गाडीमागे लगेच पोलिसांची गाडी पाठलाग करतानाही पाहायला मिळत आहे. ही घटना वौकेशा (Waukesha) या शहरात रविवारी (२१ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हे दहशतवादी कृत्य वाटत नाही. अन्य एका ठिकाणाहून आरोपी फरार होत असताना त्याने गर्दीतून गाडी घातली.”

नेमकं काय घडलं?

विस्कॉन्सिनमध्ये लहान मुलं आणि नागरिक ख्रिसमस परेडचा आनंद घेत होते. यासाठी परेड सुरू असलेल्या भागातील रस्त्यांवरील वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. रस्ता बंद करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्सचा वापर केला होता. मात्र, असं असतानाही आरोपीने सुरुवातीला रस्त्यावर लावलेले बॅरिकेट तोडत परेडच्या रस्त्यावर गाडी नेली.

यानंतर आरोपीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ख्रिसमस परेडमधील लोकांना भरधाव वेगाने चिरडलं. अचानक घडलेल्या या घटनेने या ठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. हा प्रकार पाहिलेल्या नागरिकांना मोठा धक्का बसला.

पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत गाडीसह अटक केलीय. त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपी इतर ठिकाणाहून पळून चालला होता. कुणाच्या हाती लागू नये म्हणून त्याने बॅरिकेट्स तोडत परेड रस्त्यावर गाडी घातली.

स्थानिक प्रशासनाने अद्याप या घटनेबाबत अधिक तपशील दिलेले नाही. त्यामुळे मृतांची यादी समोर आलेली नाही. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.