Suvendu Adhikari First Cabinet Meeting Decisions 2026: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. भाजपाने निवडणुकीत दिलेले एक महत्वाचे आश्वासन अधिकारी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पूर्ण केले आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आजपासूनच (११ मे) सुरु होईल, अशी घोषणा अधिकारी यांनी केली. हे हस्तांतरण ४५ दिवसांत पूर्ण केले जाईल, असेही सुवेंदू यांनी स्पष्ट केले. बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हे कुंपण महत्वाचे असल्याचे भाजपा सरकारने म्हटले आहे.

मंत्रिमंडळाची पहिली बैठक

“मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. पहिल्याच बैठकीत त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर कुंपणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला. भारत-बांगलादेश सीमेवर कुंपणासाठी आवश्यक जागेचे संपूर्ण नियंत्रण बीएसएफला दिले जाईल”, असे सुवेंदू यांनी स्पष्ट केले. याशिवाय या बैठकीत आयुष्मान भारत योजना, सरकारी बसमधून महिलांसाठी मोफत प्रवास आणि ‘अन्नपूर्णा भांडार’याबाबत निर्णय घेण्यात आला.

४५ दिवसांत कुंपणाचे काम पूर्ण होणार

“मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बांगलादेश सीमेवर कुंपणासाठी बीएसएफकडे जमीन हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेला आजपासूनच सुरुवात झाली असून, पुढील ४५ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. कुंपण पूर्ण झाल्यानंतर अवैध घुसखोरीचा प्रश्न निकालात निघेल” , असे मुख्यमंत्री सुवेंदू माध्यमांशी बोलताना म्हणाले. बंगालच्या निवडणुकीत अवैध घुसखोरीचा मुद्दा भाजपाने उचलून धरला होता. ममतांच्या तृणमूल काँग्रेसवर यावरुन जोरदार टीका देखील करण्यात आली होती. सीमेवर ४५ दिवसांत कुंपणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले होते.

घुसखोरीचा मुद्दा

बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये ४,०९७ किलोमीटरची लांब सीमा आहे. यापैकी ३,२४० किमी सीमेला कुंपण घालण्यात आले आहे. पण, अद्याप ८५० किलोमीटर बाकी आहे. यापैकी १७५ किलोमीटर सीमा आव्हानात्मक भूभाग असल्याचे सांगितले जाते. तृणमूल सरकारच्या काळात बीएसएफकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी विलंब करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. नियोजित १२७ किलोमीटर पैकी केवळ ८ किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यात आल्याचा आरोप सुवेंदू यांनी माध्यमांशी बोलताना केला.

०१ जूनपासून सुरु होणार तीन योजना

याशिवाय सुवेंदू यांच्या सरकारने राज्यात एक जूनपासून “आयुष्यमान भारत” आरोग्य योजना सुरु करण्यात निर्णय घेतला आहे. राज्यात पूर्वीपासून सुरु असणाऱ्या आरोग्य योजना देखील तशाच सुरु राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, ‘अन्नपूर्णा भांडार’ ही योजना देखील ०१ जूनपासून सुरु करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला थेट खात्यावर तीन हजार रुपये मिळणार आहेत. बंगाल सरकारने एक जूनपासून महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास सुरु करण्याची घोषणा केली आहे. ही योजना देखील एक जूनपासून सुरु होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.