Suvendu Adhikari eating Kalighat Fish Bhog: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी कोलकात्यातील प्रसिद्ध कालीघाट मंदिराला भेट देत देवी कालीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरातील पारंपरिक प्रथेनुसार मासे आणि पुलावचा भोग स्वीकारला. बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा यांनी बंगाली हिंदूंनी दुर्गापूजेच्या काळात मांसाहार टाळावा, असे आवाहन केल्यानंतर काही दिवसांतच अधिकारी यांनी मंदिराला भेट देऊन मांसाहार केला. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
कौशिकी अमावस्येचे महत्त्व सांगताना अधिकारी म्हणाले, सनातन संस्कृतीमध्ये हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कालीघाट आणि तारापीठसह राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये या निमित्ताने विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोलकाता ही आध्यात्मिक भूमी’
अधिकारी यांनी कोलकात्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचाही उल्लेख केला. “ही कालीमातेची, दुर्गामातेची भूमी आहे. रामकृष्ण परमहंस, माँ शारदा देवी, स्वामी विवेकानंद आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्याशीही या भूमीचे नाते आहे,” असे ते म्हणाले.
भाजपाच्या पश्चिम बंगाल युनिटनेही अधिकारी यांचा कालीघाटमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. मंदिराच्या पारंपरिक प्रथेनुसार त्यांनी पुलाव आणि माशांचा पवित्र भोग स्वीकारल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
बागेश्वर बाबांनी नेमकं काय म्हटलं होतं?
काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री तीन दिवसांच्या ‘हनुमंत कथा’ कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालमध्ये आले होते. हावडा येथील लिलुआमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी बंगाली हिंदूंना नवरात्री आणि दुर्गापूजेच्या काळात भक्तिभावाने धार्मिक आचरण करण्याचे आवाहन केले. याचवेळी त्यांनी दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान मांसाहार सोडण्याचे आवाहन केले. धार्मिक प्रसंगी मांसाहार करणाऱ्यांना त्यांनी “ढोंगी” असल्याचे म्हटल्याने वाद निर्माण झाला.
बंगाली खाद्यसंस्कृतीवरून राजकीय पक्ष एकवटले
पश्चिम बंगालमध्ये मासे आणि मांस हे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे धार्मिक उत्सवांमध्ये काय खावे, याबाबत बाहेरून सल्ला देण्यास काँग्रेससह भाजपाच्या नेत्यांनीही विरोध केला. या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपाच्या भूमिकांमध्ये काही प्रमाणात समानता दिसून आली. बंगाली समाजाच्या खाद्यपद्धतींवर कोणीही आपली वैयक्तिक मते लादू नयेत, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले.
काँग्रेसकडून पोलिसांत तक्रार
बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असा दावा काँग्रेसने केला. दक्षिण कोलकाता जिल्हा काँग्रेस समितीने भवानीपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत ५ सप्टेंबर रोजी हावडा येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान शास्त्री यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने कारवाई आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली.
‘बंगाली जे खातात तेच खात राहतील’
भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनीही बागेश्वर बाबांच्या आवाहनाला विरोध केला. “बंगाली जे खात आहेत, तेच खात राहतील. कोणीही पश्चिम बंगालच्या लोकांना काय खावे हे सांगू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अष्टमीला लुची आणि नवमीला बकऱ्याचे मांस खाण्याची बंगालमधील पारंपरिक पद्धत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. “मला माझ्या पद्धतीने जगू द्या. बंगाली जे खात आहेत, तेच खातील. बंगाली लोक मासे आणि मांस खाऊ शकत नाहीत का?” असा सवाल करत त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचाही संदर्भ दिला.
कालीघाटमधील ‘फिश भोग’मुळे चर्चेला नवा रंग
बागेश्वर बाबांच्या मांसाहारविरोधी वक्तव्यानंतर बंगालमध्ये सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकाऱ्यांनी कालीघाट मंदिरातील पारंपरिक मासे आणि पुलावाचा भोग स्वीकारल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळाला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आपल्या वक्तव्यात बागेश्वर बाबांच्या विधानाचा थेट उल्लेख न करता कौशिकी अमावस्येचे धार्मिक महत्त्व आणि कालीघाटच्या परंपरेवर भर दिला.
