Suvendu Adhikari Net Worth and financial assets report after West Bengal Election victory : भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. भवानीपूर येथून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आता मुख्यमंत्री बनले आहेत. यापूर्वी ८ मे रोजी त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.
सध्या सुवेंदू अधिकारी यांची राजकीय प्रगती जरी चर्चेचा विषय ठरल आहे. यापूर्वी २०२६ च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीबाबतही चांगलीच चर्चा झाली होती. पश्चिम बंगालच्या सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या अधिकारी यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे याचा आपण आढावा घेणार आहोत.
एकूण संपत्ती किती आहे?
सुवेंदू अधिकारी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी एकूण ८५.८७ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये २४.५७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ६१.३० लाख रुपयांची स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिकारी यांच्यावर कोणतेही कर्ज नाही, तसेच त्यांच्यावर कुठलीही सरकारी थकबाकीही नाही.
अधिकारी यांच्याकडे जंगम मालमत्ता ही २४.५७ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे त्यांनी फक्त १२ हजार रुपयांची रोकड त्यांच्याकडे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच त्यांच्याकडे कार किंवा खासगी वाहन नाही. तसेच दागिन्यांच्या कॉलममध्येदेखील त्यांनी शून्य असा उल्लेख केला आहे.
त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा पीएनबी, एसबीआय, ॲक्सिस बँक, आयडीबीआय बँक आणि कांती व नंदीग्राममधील सहकारी बँकांसारख्या विविध बँकांमधील खात्यांमध्ये ठेवींच्या रुपात आहे. या ठेवींची एकूण रक्कम ७.३४ लाख रुपये आहे.
गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास ती प्रामुख्याने पारंपारिक बचतीच्या रुपात आहे. यामध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ५.४५ लाख रुपये, तर किसान विकास पत्रामध्ये २.६० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या टपाल बचत खात्यात ६०५२३ रुपये जमा आहेत.याबरोबरच सहा एलआयसी पॉलिसींमध्ये एकूण ७.७१ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. बाँड्स आणि शेअर्समधील गुंतवणूक मात्र फक्त १४२४० रुपये इतकीच आहे.
अधिकारी यांची स्थावर मालमत्ता ही ६१.३० लाखांची आहे. जी प्रामुख्याने त्यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या पूर्व मेदिनीपूरमध्ये आहे. त्यांनी नंदीग्राममध्ये ९.०५ लाख रुपये किमतीची शेतजमीन जाहीर केली आहे. याशिवाय पंचदरिया, धर्मदासबार, कारकुली आणि सिनाचुरजलपाई येथील इतर शेतजमिनींची एकत्रित किंमत ही २७.५ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे तामलुक आणि कुमारपूर येथे फ्लॅट्स, तसेच कारकुली येथे एकत्रित मालकी असलेली वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ज्याचे एकूण मूल्य २४.७५ लाख रुपये आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी, अधिकारी यांनी त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये १७.३८ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न दाखवले आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये आमदाराचे वेतन, खासदाराचे निवृत्तीवेतन आणि व्यावसायांचा समावेश आहे.
