भवानीपूर येथे टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी उद्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी ७ मे रोजी अधिकृतपणे पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. मात्र आता विधानसभा विसर्जित झाल्याने त्यांच्याकडे धोरणात्मक निर्णय घेण्याचे किंवा मुख्यमंत्री म्हणून शासन करण्याचे कोणतेही घटनात्मक अधिकार उरलेले नाहीत.
ममता बॅनर्जी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का?
नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला आधीच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहाणे अनिवार्य करणारा असा कोणताही संवैधानिक नियम किंवा कायदा नाही. हे प्रामुख्याने राजकीय परंपरा, शिष्टाचार आणि सत्तेतून पायउतार होणाऱ्या व नव्याने निवडून आलेल्या नेतृत्वामधील संबंधांवर अवलंबून असते.
परंपरेनुसार, लोकशाही मार्गाने सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण होत आहे असा संदेश देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतात. ते तेथे उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करतात आणि नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतात. ही सत्ता सोपवण्याची एक प्रतिकात्मक प्रक्रिया मानली जाते.
मात्र अशीही अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये मावळत्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय कटुता, ताणलेले संबंध, प्रकृतीची कारणे किंवा वेळेचा अभाव अशी कारणे देत या सोहळ्याला बगल दिली आहे. ते गैरहजर राहिल्यास याला कुठल्याही प्रोटोकॉलचे उल्लंघन मानले जात नाही.
आज कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ साली नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्ष त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजार मतांनी दणदणीत पराभव केला.
