PM Modi and DCM Eknath Shinde interaction : पश्चि बंगालमध्ये आज शपथविधी सोहळा पार पडला असून भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपासाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता, कारण, भाजपाने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली असून सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या टीएमकेला पराभवाची धूळ चारली आहे. दरम्यान, आज पश्चिम बंगालमध्ये शपथविधी झाला असला तरीही तेथील एका दृष्याने महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. कारण, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळ्याकरता देशभरातली अनेक नेते उपस्थित होते. विविध राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर होते. तसंच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील नेत्यांना हस्तांदोलन करत भेट घेत होते.

चंद्राबाबू नायडू, जे. पी. नड्डा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन थांबले. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यांच्याबाजूला चिराग पासवानही उपस्थित होते.

दरम्यान, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. एकनाथ शिंदे यांचं विमान काही दिवसांपूर्वी भरकटलं होतं. याबाबत मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा नाही.

भाजपा नेत्यांमध्ये आनंद

शनिवारी कोलकाताच्या प्रतिष्ठित अशा ब्रिगेड परेड मैदानावर सुवेंदू अधिकारी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. राज्यपाल आरएन रवी यांनी सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपाचे नेते यावेळी भावनिक आणि त्याचवेळी आनंदितही असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मंचावरील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. मंचावर उपस्थित ९८ वर्षीय माखनलाल सरकार यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना आलिंगन देत, त्यांच्या पायांना स्पर्श करत आशीर्वाद घेतले. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे सहकारी असलेले सरकार हे भाजपाच्या सुरुवातीच्या काळातील पश्चिम बंगालमधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.