Suvendu Adhikari Oath Ceremony West Bengal CM: पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. बंगालच्या राज्यपालांनी अधिकारी यांना शपथ दिली. बंगालमधील या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थित हा थपधविधी सोहळा पार पडला. सुवेंदू अधिकारी यांच्यासह पाच आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
भव्य शपथविधी सोहळा
कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, अभिनेते मिथून यांच्यासह इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. सुवेंदू अधिकाऱ्यांनी भवानीपूरमधून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आहे. प्रथेनुसार, ममता बॅनर्जी यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
अधिकारी यांच्यासह पाच आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर दिलीप घोष यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अग्निमित्रा पॉल यांनीही शपथ घेतली. फॅशन डिझायनर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या अग्निमित्रा या आसनसोल दक्षिणमधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि मथाभंगा मतदारसंघाचे आमदार निसिथ प्रमाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
मोदींची ग्रँड एन्ट्री
अधिकारी यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिगेड परेड मैदानावर जिप्सीमधून ग्रँड एन्ट्री केली. यावेळी जिप्सीमध्ये त्यांच्याबरोबर सुवेंदू अधिकारीही उपस्थित होते. थपथविधी सोहळ्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती. याशिवाय विविध भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.
ममतांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला. भाजापने बंगालच्या इतिहासात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच २०७ जागा जिंकल्या तर टीएमसीला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाने निवडणूक आयोगाला हाताशी धरुन विजय मिळवल्याचा आरोपा ममतांनी केला. याशिवाय अनेक गैरप्रकार या निवडणुकीत झाल्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात आले. तसेच, नैतिक विजय झाल्याचा दावा करत राजीनामा न देण्याची भूमिका घेतली. ममतांच्या भूमिकेचा इंडिया आघाडीकडून देखील समर्थन करण्यात आले होते.
