Mamata Banerjee targets BJP for opposition unity : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील सर्व विरोधी पक्षांना भाजपाविरुद्ध लढण्यासाठी एका संयुक्त व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले. १५ वर्षांच्या सत्ताकाळानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडून भाजपाने राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही (NGOs) भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, सुवेंदू अधिकारी यांनी बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि भाजपाचे पहिले मुख्यमंत्री बनले, त्याच पार्श्वभूमीवर ममता यांचा हा संदेश आला आहे.

भाजपाविरोधात एकत्र या

विधानसभा निवडणुकीत ममतांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला असून, ४ मे रोजी भाजपाने दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कालीघाट येथील निवासस्थानासमोर एका छोट्या सभेला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या, “मी डाव्या आणि अति-डाव्यांसह सर्व विरोधी पक्षांना भाजपाविरुद्ध संयुक्त व्यासपीठ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते.”

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र

ममता यांनी राष्ट्रीय पक्षांनाही त्यांच्या संयुक्त व्यासपीठात सामील होण्याचे आवाहन केले. त्या पुढे म्हणाल्या की, जर कोणत्याही राजकीय पक्षाला या संदर्भात चर्चा करायची असेल तर त्या चर्चेसाठी तयार आहेत. “शत्रूचा शत्रू आपला मित्र असा विचार करण्याची ही वेळ नाही, भाजपा हा आपला पहिला शत्रू आहे”, असं टीएमसी नेत्या म्हणाल्या.

बंगालमधील टीएमसीच्या पराभवानंतर इंडिया (INDIA) आघाडीबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. भाजपाच्या मोठ्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी आघाडीचे नेते अखिलेश यादव यांनी ममतांची भेट घेतली आणि निवडणूक आयोग व भाजपाने बंगालमधील जनादेश चोरला असल्याच्या त्यांच्या दाव्याला पाठिंबा दिला. ममता ‘इंडिया’ आघाडीचा भाग असल्या तरी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढला होता. दरम्यान, राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर एक छोटा व्हिडिओ पोस्ट करून विरोधी आघाडीबाबत मोठा दावा केला. “लिहून घ्या,” असे म्हणत राहुल गांधींनी शुक्रवारी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले की, “भाजपा आणि नरेंद्र मोदींना इतर कोणताही पक्ष हरवू शकत नाही. केवळ काँग्रेसच हे करू शकते.

“विरोधी आघाडीला तामिळनाडूमध्येही धक्का बसला आहे, जिथे काँग्रेसने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या विजय यांच्या टीव्हीकेला (TVK) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकसभेतील संख्याबळाच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार असलेल्या डीएमकेसोबतच्या (DMK) भविष्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.