Chandranath Rath Murder Case Investigation Update: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तर प्रदेशात छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असून, या तपासातून हत्येच्या कटाचे संपूर्ण स्वरूप उघडकीस येईल अशी आशा आहे.

अयोध्या येथून संशयिताला अटक 

कोलकाता आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राज सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. राज सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी असून तो बिहारच्या बक्सर जिल्ह्यात राहत होता. ६ मे रोजी ही हत्या झाल्यानंतर आरोपी राज सिंह अयोध्येत लपून बसला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कोलकाता येथे आणण्यात आले आहे. या अटकेमुळे या हत्येचे धागेदोरे आता आंतरराज्य गुन्हेगारीशी जोडले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहारमधील बक्सर येथून दोन संशयितांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बिहारमधील बक्सर येथून मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर केलेल्या चौकशीनंतर, आज सकाळी मध्यमग्राम पोलीस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली.

यूपीआय व्यवहारातून उलगडा

चंद्रनाथ रथ हत्याकांडाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सर्वात मोठा तांत्रिक पुरावा एका यूपीआय पेमेंटमधून मिळाला. तपास यंत्रणांच्या मते, खुनासाठी वापरलेली कार जेव्हा हावडा येथील बाली टोल प्लाझामधून गेली, तेव्हा आरोपींनी फास्टॅग किंवा रोख रकमेऐवजी यूपीआयद्वारे टोल भरला. या डिजिटल व्यवहारामुळे पोलिसांना संशयितांचे मोबाईल नंबर आणि बँक तपशील मिळाले. तांत्रिक मागोवा घेत, तपास त्यांना उत्तर प्रदेश आणि झारखंडपर्यंत घेऊन गेला.

हत्येचा थरार आणि पूर्वनियोजित कट

चंद्रनाथ रथ हे हवाई दलाचे निवृत्त अधिकारी होते. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथील त्यांच्या घराजवळच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तपासातील माहितीनुसार, रथ यांची एसयूव्ही गाडी त्यांच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना एका सिल्व्हर रंगाच्या निसान मायक्रा कारने त्यांचा रस्ता अडवला. गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी रथ यांच्यावर जवळून गोळीबार केला.

महत्त्वाची बाब म्हणजे, रथ गाडीत पुढच्या सीटवर बसले आहेत याची नेमकी माहिती हल्लेखोरांना होती. यावरून हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि रेकी करून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि पुढील तपास

गुन्ह्यात वापरलेली निसान मायक्रा कार पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्याच्या ठिकाणाजवळून आणि बारासात परिसरातून दोन दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, ही सर्व वाहने चोरीची असण्याची शक्यता आहे. या हत्येमागे राजकीय वैमनस्य आहे की अन्य काही वैयक्तिक कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कनेक्शन समोर आल्याने आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.

हत्येचा थरार: कसा रचला कट? 

माजी हवाई दल अधिकारी असलेले चंद्रनाथ रथ यांची उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तपासानुसार…

  • रथ यांची एसयूव्ही घरापासून २०० मीटर अंतरावर असताना एका निसान मायक्रा कारने त्यांचा रस्ता अडवला.
  • गाडी थांबताच दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पुढच्या सीटवर बसलेल्या रथ यांच्यावर जवळून गोळीबार केला.
  • हल्लेखोरांना रथ यांच्या हालचालींची आणि ते गाडीत कुठे बसले आहेत याची अचूक माहिती होती, ज्यावरून हा खून   पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासात ही वाहने चोरीची असल्याचे समोर आले आहे.

चंद्रनाथ रथ कोण होते?

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे  निकटचे सहकारी आणि स्वीय सहाय्यक म्हणून ओळखले जात होते. २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या तीव्र राजकीय हिंसाचारादरम्यान, ६ मे २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील बारासातच्या मध्यमग्राम येथे रथ यांची हत्या करण्यात आली.

राजकीय आरोप-प्रत्यारोप 

या घटनेमुळे बंगालमध्ये मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. सुवेंदू अधिकारी यांनी याला ‘नियोजित हत्या’ म्हटले असून तृणमूल काँग्रेसवर (TMC) गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी व्यावसायिक वैमनस्य किंवा इतर कारणांचाही तपास सुरू ठेवला आहे.