पीटीआय, कोलकाता

सुवेंदू अधिकारी यांनी येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शनिवारी शपथ घेतली. राज्यात पहिल्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपाल आर.एन.रवी यांनी सुवेंदू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी जनसमुदायातून ‘जय श्री राम’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर जाण्यापूर्वी वाहनातून खाली उतरत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जाऊन अभिवादन केले. नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन मतदारसंघातून विजयी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांची शुक्रवारीच भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. अधिकारी यांच्यानंतर पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. यात ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा प्रथम समावेश होता. पाठोपाठ अंगमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू व निशिथ प्रामाणिक यांना शपथ देण्यात आली.

मंत्रिमंडळ रचनेत जातीय व विभागीय संतुलन ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ब्राह्मण, इतर मागासवर्गीय, आदिवासी, मतुआ आणि राजवंशी समुदायाला प्रतिनिधित्व देण्यात आले. सुवेंदू अधिकारी हे ब्राह्मण समुदायातून येतात. तर दिलीप घोष इतर मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. पॉल या कायस्थ असून, कीर्तनिया मतुआ समाजाचे प्रमुख नेते आहेत. टुडु हे आदिवासी असून, प्रामाणिक हे उत्तर बंगालमध्ये प्रभावी असलेल्या राजवंशी समुदायातून येतात. यातील दोघे जण उत्तर बंगाल तर तिघे दक्षिण बंगालमधून येतात.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत कोलकाता शहरातील एकही सदस्य नाही. सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून, त्याच दिवशी पहिली बैठक होईल असे सूत्रांनी नमूद केले. ब्रिगेड परेड मैदान हे ऐकाकाळी डाव्याचे वैचारिक प्रभावक्षेत्र मानले जात. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेनंतर त्यांच्या शक्तिप्रदर्शनाचे केंद्र होते. तेथेच भाजपने शपथविधी सोहळा आयोजित करत विरोधकांना शह दिला. हजारो भाजप कार्यकर्ते या मैदानावर सकाळपासूनच उपस्थित होते. राज्यातील विधानसभेच्या २९४ पैकी २०७ जागा भाजपने जिंकल्या.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्य सचिव दुष्यंत नरिला, पोलीस महासंचालक सिद्धार्थनाथ गुप्ता व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेत कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. कोलकात्याचे पोलीस आयुक्त अजय नंद हेदेखील बैठकीला उपस्थित होते. यापूर्वीच्या सरकारच्या योजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी विचारणा करून त्या सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले.

मोदींच्या कार्यकाळात ९ राज्यांत पक्षाचे पहिल्यांदाच मुख्यमंत्री

तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची राजवट संपवून भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता प्राप्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने ९ नव्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आणि तिथे भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले. यात महाराष्ट्र, हरियाणा (२०१४), आसाम, अरुणाचल प्रदेश (२०१६) मणिपूर २०१७, त्रिपुरा २०१८, ओडिशा (२०२४), बिहार (२०२६) या राज्यांचा समावेश आहे.

९८ वर्षीय कार्यकर्त्याचा सत्कार

शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ वर्षीय भाजप कार्यकर्ते माखनलाल सरकार यांचा सत्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. सरकार यांना १९५२ मध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत काश्मीर येथे तिरंगा फडकावत असताना अटक झाली होती. भाजपच्या स्थापनेनंतर १९८० मध्ये सरकार यांनी पश्चिम दिनाजपूर, जयपायगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये समन्वयक म्हणून काम केले. सलग सात वर्षे ते जिल्हाध्यक्ष होते.