Suvendu Adhikari West Bengal CM oath controversy deepens with Sanjay Raut’s latest allegations and Narada video : पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. कोलकाता येथे पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सुवेंदू अधिकारी यांच्यासह पाच आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान या शपथविधी सोहळ्याच्या आधी शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊतांनी अधिकारी यांच्याबाबद खळबळजनक पोस्ट केली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. सुवेंदू अधिकारी हे लाच घेतना पकडले गेले होते, असे राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत आपल्या पोस्टमध्ये व्हिडीओला कॅप्शन लिहिले आहे की, “२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.टीएमसीचे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते. २०१६ च्या निवडणुकीत भाजपाने या व्हिडीओला प्रचंड प्रमोट केले, पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा भाजपाने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडीओ डिलीट करून टाकला! आता हा महात्मा भाजपाचा प.बंगालचा मुख्यमंत्री झाला आहे, आणि त्याच्या कौतुकास सारी भाजपा जमवली आहे. कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत.”
सुवेंदू अधिकारी कोण आहेत?
सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील नंदीग्रामचे आमदार आहेत. एक तळागाळातील नेते म्हणून त्यांनी एकेकाळी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याला तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांना एक प्रतिष्ठिती राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असून त्यांचा पूर्व पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव आहे. या प्रभावामुळेच अधिकारी कुटुंबाला या भागात “राजकीय सम्राट” म्हणून ओळखले जाते. अधिकारी कुटुंब मुळचं काँग्रेसी होतं. पण, ममता बॅनर्जी यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अधिकारी कुटुंब या पक्षात सामिल झाले. सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए-२ सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सूवेंदू अधिकारी यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
