मागच्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये महान नेत्यांच्या पुतळयाची विटंबना होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. गुरुवारी काही अज्ञात समाजकंटकांनी बीरभूम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंदांच्या पुतळयाची विटंबना केली. एमडी बाझार येथील स्वामी विवेकानंदांच्या पुतळयाचा चेहरा बिघडवण्यात आला होता. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

जानेवारी २०१५ मध्ये या पुतळयाचे अनावरण करण्यात आले होते. लोकल क्लबने हा पुतळा उभारला होता. समाजकंटकांनी या पुतळयाची विटंबना केली. ज्यांनी कोणी हे कृत्य केलेय त्यांना स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी परिसरात आम्ही त्यांच्या कार्याविषयी जनजागृती मोहिम राबवू असे लोकल क्लबचे सदस्य बिद्युत मंडोल यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कुल्टी येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळयाची समाजकंटकांनी विटंबना केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाही बर्दवानच्या काटवा भागात पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली होती. यावर्षी मार्च महिन्यात कोलकाता जादवपूर विद्यापीठातील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांन भाजपा विरोधी आंदोलनाच्यावेळी जन संघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अर्धपुतळयाची विटंबना केली होती.