दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलाचं डोकं फोडल्याचा दावा करणाऱ्या इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजला पोलिसांनी अटक केली होती. ‘मी एका व्यक्तीचं डोकं फोडलं, तरी मला तुरुंगात जावं लागलं नाही’ असं वादग्रस्त वक्तव्य भारद्वाजने एका मुलाखतीत बोलताना केलं होतं. त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यावरून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
या प्रकरणात स्वतंत्र भारद्वाजवर कारवाई व्हावी, यासाठी दिल्लीत आंदोलन देखील काढण्यात आलं होतं. यानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज शनिवारी अटक केली होती. स्वतंत्र भारद्वाजला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा भारद्वाजला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयाने स्वतंत्र भारद्वाजला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, स्वतंत्र भारद्वाज हा उजव्या विचारसरणीचा इन्फ्लुएन्सर असून या प्रकरणानंतर तो देशभरात चांगलाच चर्चेत आला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थीनीच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याच्यावर करण्यात आलेला आहे. जून महिन्यात जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्यावतीने आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान निशू आझाद या विद्यार्थीनीचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यावर लोखंडी कड्याने प्रहार करण्यात आला होता. या हल्ल्याचा आरोप स्वतंत्र भारद्वाजवर आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एका पॉडकास्टचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये भारद्वाजने, “मी निशूच्या वडिलांचं डोकं फोडलं. ३०७ सारख्या गंभीर कलमानंतरही मला पोलिसांनी अटक केली नाही,” असं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणानंतर सीजेपीच्या प्रतिनिधींसह खासदार चंद्रशेखर आझाद, तसेच काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आरोपींवर कठोर कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला अटक करत कारवाई केली होती.
स्वतंत्र भारद्वाजने काय स्पष्टीकरण दिलं होतं?
दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं. मॉब लिंचिंगच्या भीतीने आपण केवळ स्वसंरक्षणासाठी (आत्मरक्षण) हल्ला केल्याचा दावा स्वतंत्र भारद्वाजने केला होता. सोशल मीडियावर पॉडकास्टची क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठं वादळ उठलं होतं.
