दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलांचं डोकं फोडल्याचा धक्कादायक दावा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने केला होता. ‘मी एका व्यक्तीचं डोकं फोडलं, तरीही मला तुरुंगात जावं लागलं नाही’ असं वादग्रस्त वक्तव्य इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजने एका पॉडकास्टच्या मुलाखतीत बोलताना केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज याला शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं. भारद्वाज हा उजव्या विचारसरणीचा इन्फ्लुएन्सर असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी शुक्रवारी ‘सीजेपी’ने संसद मार्ग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या दरम्यान भारद्वाज उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर पळून गेल्याची माहिती समोर आली होती.
त्यानंतर दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर शनिवारी अटकेची कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
Delhi | Swatantra Bhardwaj remanded to one-day Police custody. He was produced at the residence of concerned judge at Karkardooma Court complex.
— ANI (@ANI) September 5, 2026
This is in connection with the assault incident during which Bharadwaj physically assaulted Sanjay Azad, the father of 14-year-old CJP…
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थीनीच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. मॉब लिंचिंगच्या भीतीने आपण केवळ स्वसंरक्षणासाठी (आत्मरक्षण) हल्ला केल्याचा दावा त्याने केला होता. सोशल मीडियावर पॉडकास्टची क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठं वादळ उठलं होतं.
दरम्यान, जून महिन्यात जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान निशू आझाद या विद्यार्थीनीचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यावर लोखंडी कड्याने प्रहार करण्यात आला होता. या हल्ल्याचा आरोप स्वतंत्र भारद्वाजवर आहे. सोशल मीडियावर एका पॉडकास्टचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये भारद्वाजने, “मी निशूच्या वडिलांचं डोकं फोडलं. ३०७ सारख्या गंभीर कलमानंतरही मला पोलिसांनी अटक केली नाही,” असं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शेअर केला होता.
या प्रकरणानंतर सीजेपीचे प्रतिनिधी, खासदार चंद्रशेखर आझाद, तसेच काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आरोपींवर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर कठोर कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर आता पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला अटक करत मोठी कारवाई केली आहे.
