दिल्लीतील जंतर-मंतरवर काही दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. मात्र, या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या वडिलाचं डोकं फोडल्याचा दावा इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजने एका मुलाखतीत बोलताना केला होता. भारद्वाजने केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ‘मी एका व्यक्तीचं डोकं फोडलं, तरी मला तुरुंगात जावं लागलं नाही’ असं वादग्रस्त वक्तव्य भारद्वाजने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाज अटक केली होती आणि त्यानंतर न्यायालयाने त्याला आधी एक दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या स्वतंत्र भारद्वाज हा कोठडीतच आहे. मात्र, या प्रकरणात आता एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. ‘मला राजकीय कारणांमुळे अटक करण्यात आली, तक्रारदारानेच माझ्यावर हल्ला केला होता’, असा दावा भारद्वाजने न्यायालयाला दिलेल्या निवेदनात केला. या संदर्भातील वृत्त बार अँड बेंचने दिलं.
जुलै महिन्यात जंतर-मंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनांदरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप भारद्वाजवर आहे. दरम्यान, स्वतंत्र भारद्वाजचे वकील उमेश शर्मा यांनी आज न्यायालयाला सांगितलं की, तक्रारदाराने स्वतंत्र भारद्वाजवर हल्ला केल्याचा व्हिडीओ आहे. तरीही दिल्ली पोलिसांनी तक्रारदाराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही, असं वृत्तात म्हटलं.
भारद्वाज यांचे वकील शर्मा यांनी न्यायालयात असा दावा केला की, सीजेपी आंदोलनादरम्यान तक्रारदारानेच भारद्वाजवर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि या व्हिडीओमध्ये भारद्वाज खाली पडताना आणि पोलीस त्यांची सुटका करताना दिसत आहेत.
दुसरीकडे तक्रारदाराच्यावतीने वकील स्वाती खन्ना यांनी बाजू मांडली. त्यांनी सांगितलं की, भारद्वाजने् तक्रारदाराविरुद्ध जातीवाचक अपशब्द वापरले होते आणि तक्रारदारावर हल्ला केला होता. याची कबुली त्यांनी एका व्हिडीओमध्येही दिली होती.
न्यायालयाने निकाल राखून ठेवला
स्वतंत्र भारद्वाजच्या जामिनाबाबतचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने स्वतंत्र भारद्वाजच्या जामिनाबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जून महिन्यात जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान निशू आझाद या विद्यार्थीनीचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यावर लोखंडी कड्याने प्रहार करण्यात आला होता. या हल्ल्याचा आरोप स्वतंत्र भारद्वाजवर आहे. सोशल मीडियावर एका पॉडकास्टचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये भारद्वाजने, “मी निशूच्या वडिलांचं डोकं फोडलं. ३०७ सारख्या गंभीर कलमानंतरही मला पोलिसांनी अटक केली नाही,” असं वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शेअर केला होता.
या प्रकरणानंतर सीजेपीचे प्रतिनिधी, खासदार चंद्रशेखर आझाद, तसेच काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आरोपींवर कठोर कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर आता पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला अटक करत मोठी कारवाई केली होती.
