आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली जल बोर्डमधील कथित घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिल्ली जल बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आम आदमी पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे दिल्लीत चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना भाजपाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘दिल्लीत आम आदमी पक्षाचं सरकार सत्तेत असताना अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचार घडवून आणायचे’ असा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला. आम आदमी पक्षाने दिल्लीतील शाळांच्या वर्गखोल्यांचं बांधकाम, मद्य धोरण, दिल्ली जल बोर्ड यासह आदी प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं.
स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?
“गेल्या १० वर्षांत दिल्लीत अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराचं दुकान चालवत होते. मग शाळांच्या वर्गखोल्यांचं बांधकाम असो किंवा मद्य घोटाळा, असे अनेक घोटाळे त्यांनी केले आहेत. केजरीवाल यांनी मंत्र्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला. जेव्हा संबंधित मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा केजरीवाल यांनी त्या मंत्र्यांनाच दोष दिला”, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली आहे.
“अरविंद केजरीवाल हे अत्यंत चलाखीने काम करत होते. त्यांनी स्वतःकडे कोणतंही खातं ठेवलं नव्हतं. कारण ते मंत्र्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून घेत असत. मात्र, जेव्हा संबंधित मंत्र्याचा भ्रष्टाचार उघड होत असायचा, तेव्हा ते त्या मंत्र्यांलाच दोष देत असायचे”, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावरही केले गंभीर आरोप
“दिल्ली जल बोर्डाचा जो एसटीपी घोटाळा समोर आला, तो अतिशय गंभीर आहे. कारण यमुना नदीच्या स्वच्छतेमध्ये एसटीपी हा एक महत्त्वाचा घटक आहे. एवढंच नाही तर सत्येंद्र जैन हे पंजाबमध्ये आम आदमी पक्षासाठी कलेक्शन एजंट म्हणून काम करत आहेत”, असा गंभीर आरोप स्वाती मालीवाल यांनी केला आहे.
