Swati Maliwal On Arvind Kejriwal : सध्या आम आदमी पक्षात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. शुक्रवारी आम आदमी पक्षात मोठी फूट पडली. राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपात प्रवेशही केला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.

या सर्व घडामोडीनंतर आता खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. ‘अरविंद केजरीवाल हे आधी फाटलेलं शर्ट घालायचे आणि सत्ता येताच त्यांनी १०० कोटींचा बंगला बांधला’, अशा शब्दांत स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.

स्वाती मालीवाल काय म्हणाल्या?

“आज जर कोणी खरं गद्दार असेल, तर ते अरविंद केजरीवाल आहेत. कारण जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलं होतं, तेव्हा ते दोन रुपयांचा पेन वापरायचे. फाटलेलं शर्ट घालायचे आणि एका छोट्या गाडीतून फिरायचे. हे सर्व पाहून आम्हाला प्रेरणा मिळायची आणि देशातील जनताही त्यांच्यापासून खूप प्रभावित होत असायची. मात्र, सत्तेवर येताच अरविंद केजरीवाल यांनी लगेच स्वतःसाठी १०० कोटी रुपयांचं घर बांधलं”, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

केजरीवाल यांचे सहाय्यक बिभव कुमार यांनी मालीवाल यांना कथितपणे मारहाण केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल म्हणाल्या, “२००६ पासून मी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत आहे. प्रत्येक आंदोलनात त्यांना पाठिंबा दिला. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी माझ्याच घरात एका गुंडाकडून मला मारहाण केली. जेव्हा मी याविरोधात आवाज उठवला तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या आणि या घटनेसंदर्भात मी दाखल केलेला एफआयआर मागे घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव टाकला”, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली.

भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला?

भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत स्वाती मालीवाल यांनी म्हटलं की, “पंतप्रधान मोदी ऐतिहासिक निर्णय घेतात. त्यामुळे भाजपामध्ये जाण्याचा निर्णय हा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे घेतला. मी कोणत्याही दबावाखाली भाजपामध्ये सामील झाले नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर माझा विश्वास असल्यामुळे सामील झाले. तसेच ज्यांनाही चांगलं राजकारण करायचं आहे त्या सर्वांना मी भाजपामध्ये सामील होण्याचं आवाहन करते”, असं स्वाती मालीवाल यांनी एएनआयशी बोलताना म्हटल्याचं वृत्तात म्हटलं.

“पंजाब ‘आप’चं ‘वैयक्तिक एटीएम” : स्वाती मालीवाल

स्वाती मालीवाल यांनी दावा केला की, “‘आप’ची सत्ता असलेलं पंजाब हे एकमेव राज्य आहे. ‘आप’ या राज्याला आपलं ‘वैयक्तिक एटीएम’ बनवत आहे. जे पक्षाविरुद्ध आवाज उठवतात त्यांच्यावर एफआयआर दाखल केले जात आहेत”, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.

स्वाती मालिवाल यांनी काय पोस्ट केली?

“मी २००६ मध्ये माझी नोकरी सोडून देशसेवा करण्याचा मार्ग निवडला. त्यानंतर माहिती अधिकार आंदोलन आणि अण्णा हजारे यांचं आंदोलन, नंतर आम आदमी पक्षाची स्थापना, त्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या आठ वर्षांच्या काळात मी प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिकपणाने व निष्ठेने योगदान दिलं, काम केलं. मात्र, आज आम्हाला अत्यंत दुःखाने सांगावं लागत आहे की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सांगण्यावरून संपूर्ण आम आदमी पार्टी प्रामाणिक राजकारणाच्या तत्त्वापासून आणि मूल्यांपासून भरकटली आहे. ज्यांच्या आधारे आम्ही हा प्रवास सुरू केला होता, त्यांच्याच सांगण्यावरून त्यांच्याच घरी माझ्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. एवढंच नाही तर त्यांनीच मला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती”, असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेतील ‘आप’चं संख्याबळ ३ वर

आम आदमी पक्षाचे राज्यसभेत एकूण १० खासदार होते. मात्र, यातील ७ खासदार हे भाजपाच्या गळाला लागले असून या ७ पैकी ३ खासदारांनी आजच भाजपात प्रवेश देखील केला. त्यामुळे आता राज्यसभेत आम आदमी पक्षाचं संख्याबळ १० वरून फक्त 3 वर आलं आहे. या तीनमध्ये संजय सिंह, संत बलबीर सिंग सीचेवाल आणि एन.डी.गुप्ता यांचा समावेश आहे.

भाजपाच्या गळाला लागलेले सात खासदार कोण?

राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यातील राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक यांनी भाजपात प्रवेश देखील केला आहे.

भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत केजरीवालांना कसा धक्का दिला?

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात घडामोडी सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून आम आदमी पक्षाने हटवलं होतं. त्यामुळे खासदार राघव चड्ढा हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र, शुक्रवारी खासदार राघव चड्ढा यांच्यासह काही खासदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने ‘ऑपरेशन लोटस’ नेमकं कसं राबवलं? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.