डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात जगातली आघाडीवर असलेल्या स्वीडन देशाने आते एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वीडन मधील शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर पुर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी स्कीन टाईम कमी करून प्रत्यक्ष पुस्तकांव्दारे शिक्षणावर भर दिला जाणार आहे. याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

निर्णय का घेण्यात आला?

स्वीडनच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष जोआर फॉर्सेल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये लिहिण्याची आणि वाचण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून आले आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार (PISA 2022), स्वीडनमधील नववीच्या जवळपास २४.३% विद्यार्थ्यांना वाचनाचा प्राथमिक स्तरही गाठता आलेला नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांऐवजी जुन्या, पारंपारिक पद्धती आणि पुस्तके मुलांच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर आहेत, या निष्कर्षावर सरकार आले आहे.

सरकारची तयारी आणि नवीन नियम

सरकारने शाळांमध्ये नवीन पाठ्यपुस्तके आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शिका खरेदी करण्यासाठी ५५ कोटींहून अधिक स्वीडन क्रोना (सुमारे $५९ दशलक्ष) निधी मंजूर केला आहे. काही शाळांमध्ये ‘मोबाईल हॉटेल’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. वर्गात येताना विद्यार्थी आपले फोन एका बॉक्समध्ये जमा करतात आणि तास संपल्यावरच ते परत दिले जातात.

२ वर्षांखालील मुलांसाठी डिजिटल साहित्याचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, २०२८ पर्यंत संपूर्ण पुस्तकांवर आधारित नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. केवळ शाळेतच नाही, तर घरातही पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवावा आणि घरात ‘स्क्रीन-मुक्त क्षेत्र’ तयार करावेत, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य संस्थेने दिला आहे.

जागतिक स्तरावर बदलणारे चित्र

फक्त स्वीडनच नाही, तर डेन्मार्क आणि फिनलँड यांसारख्या शेजारील देशांनीही असेच निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय स्पेन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील ‘लॉस एंजेलिस स्कूल डिस्ट्रिक्ट’ने देखील शाळांमध्ये स्क्रीन टाईमवर मर्यादा आणल्या आहेत. “जेव्हा मुले हाताने लिहितात किंवा प्रत्यक्ष पुस्तकातून वाचतात, तेव्हा त्यांच्या मेंदूचा कार्यभाग अधिक सक्रिय होतो आणि शिकलेली गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहते,” असे लंड विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संमिश्र प्रतिक्रिया

या निर्णयाला काही जणांचा विरोधही आहे. ‘स्वीडिश एडटेक इंडस्ट्री’च्या मते, भविष्यातील ९०% नोकऱ्यांसाठी डिजिटल कौशल्यांची गरज असेल, त्यामुळे या बंदीमुळे मुले मागे पडू शकतात. परंतु, बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, मोबाईल नसल्यामुळे वर्गात लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे झाले आहे आणि पुस्तकांमुळे अभ्यास चांगला समजतो.