चिनी बनावटीच्या टेस्ट कीटने साधा सर्दी-ताप असणाऱ्या ३७०० जणांना दाखवलं ‘करोना पॉझिटिव्ह’

चीनमधून मागवण्यात आलेल्या सदोष करोना चाचणी कीटमुळे युरोपीयन देशात उडाला गोंधळ

प्रातिनिधिक फोटो

चीनमधून आयात करण्यात आलेल्या करोना टेस्ट कीटमुळे स्वीडन हा देश वेगळ्याचा अडचणीमध्ये सापडला आहे. स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने बुधावारी चीनमधून आयात करण्यात आलेले करोना टेस्ट कीट सदोष असल्याचे म्हटले आहे. या कीटच्या मदतीने चाचण्या करण्यात आलेल्या ३७०० जणांवर करोनाचे उपचार सुरु करण्यात आले. मात्र हे लोकं ठणठणीत असल्याने नंतर उघड झाले. करोना चाचणी कीटमध्ये असणाऱ्या दोषांमुळे या रुग्णांच्या करोना चाचणीचे निकाल सकारात्कम दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाची लागण न झालेल्या ३७०० रुग्णांवर करोना रुग्ण म्हणून उपचार केले जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये समोर आल्याचे स्वीडनने म्हटले आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधून आयात करण्यात आलेले पीसीआर करोना चाचणी कीट सदोष असल्याने या कीटच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्व चाचण्यांचे निकाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आले. चीनमधील बीआयजी जेनोमिक्स कंपनीच्या या टेस्ट कीटमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. याच कंपनीचे कीट जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कीटच्या मदतीने चाचणी करण्यात आलेल्या लोकांमध्ये करोनाची कोणतीच लक्षण दिसून येत नव्हती. मात्र चाचणीचे निकाल सकारात्मक आल्याने हे असिम्पटोमॅटिक रुग्ण असल्याचे गृहित धरुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. याच कीटच्या आधारे स्वीडनमध्ये मार्च महिन्यापासून करोना चाचण्या घेण्यात येत आहेत. याच चाचण्यांच्या आधारावर देशातील करोनाबाधितांचा आकडा ठरवला जात आहे. त्यामुळेच आता स्वीडनमधील आरोग्य खात्याने सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचा विचार करत असून पुढील नियोजन करत आहे.

स्वीडनने दिलेल्या माहितीनुसार या करोना चाचणी कीटच्या वापरामुळे करोनासारखी लक्षण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला करोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलं. ज्या ज्या लोकांना सर्दी किंवा ताप आहे ते सर्व करोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवण्यात आलं होतं. मात्र या सर्दी आणि तापाची कारणं वेगळी असल्याचे नंतर स्पष्ट झालं. त्यामुळे आता आरोग्य विभागाने या लोकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या ३७०० प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर देशातील करोना रुग्णांच्या आकडेवारीसंदर्भात चौकशी केली जाईल असं स्वीडनने स्पष्ट केलं आहे. या करोना कीटमध्ये असणाऱ्या दोषासंदर्भांतील आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती युरोपीयन युनियानच्या आरोग्य विभागाला आणि जागतिक आरोग्य संघटनेला दिली असल्याचेही स्वीडनने म्हटलं आहे. स्वीडनमध्ये करोनाचे ८६ हजार ८०० हून अधिक रुग्ण आढळून आले असून पाच हजार ८०० हून अधिक जणांचा आतापर्यंत (२६ ऑगस्ट २०२०) मृत्यू झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sweden uncovers 3700 false positives from covid 19 test kit scsg

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या