चॉकलेट म्हटले म्हणजे सर्वाच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात स्वीस चॉकलेट असेल तर बोलायलाच नको. स्वित्र्झलडची चॉकलेट्स जगप्रसिद्ध आहेत व तिथे हा चॉकलेट तयार करण्याचा उद्योग मोठय़ा प्रमाणावर चालतो. आता ही उच्च दर्जाची स्वीस चॉकलेट्स आपल्याला किफायतशीर दरात मिळणार आहेत कारण इफ्टाच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत जे देश आहेत त्या चार देशांत स्वित्र्झलड आहे व त्या देशांशी आपला करार झाल्याने या चॉकलेटवरील आयातशुल्क माफ होणार आहे. याबाबत अजून बोलणी प्रगती पथावर असून उच्च दर्जाच्या चॉकलेट्सवरील आयातशुल्क ३० टक्क्य़ांनी कमी करावे, अशी मागणी भारताने स्वित्र्झलडकडे केली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारत व युरोप मुक्त व्यापार संघटना (इफ्टा) आता मुक्त व्यापार करारासाठी प्रयत्नशील असून इफ्टामध्ये स्वित्र्झलड, आइसलँड, नॉर्वे व लिशेनस्टेन हे देश येतात. चॉकलेटवरील आयात शुल्क कमी झाल्यास परदेशातील चांगली चॉकलेट्स आपल्याला तुलनेने किफायतशीर दराने मिळतील. किंबहुना स्वित्र्झलड किंवा बेल्जियममधून येताना चॉकलेट्स कमी किमतीत आणता येतील. शिवाय आता असा विचार केला जात आहे की, आयातशुल्क कमी करून त्यांनी ही चॉकलेट्स भारतातच विकावीत. भारत ही चॉकलेटची एक वाढती बाजारपेठ असून कॅडबरी व नेसले या बहुराष्ट्रीय कंपन्यांची चॉकलेट बाजारपेठ ३ हजार कोटींची असून ती दरवर्षी १५ टक्क्य़ांनी वाढत आहे. भारत व इफ्टा यांच्यातील व्यापार ३४.४८ अब्ज डॉलरचा आहे. २०११-१२ मध्ये व्यापार ३७.५ अब्ज अमेरिकी डॉलरचा होता.