SWISS Flight LX147 engine failure and fire incident : दिल्ली विमानतळावर स्विस (SWISS) एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने उड्डाण रद्द करण्यात आले, या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणाऱ्या या विमानातील सर्व प्रवाशांना धावपट्टीवरच आपत्कालीन स्लाइड्सच्या (Emergency Slides) मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, LX147 या क्रमांकाच्या एअरबस A330 विमानाने पहाटे १:०८ वाजता उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेतला होता, त्याचवेळी एका इंजिनमध्ये बिघाड होऊन आग लागली.
परिस्थितीचा अंदाज घेत विमान रिकामे करण्याचा निर्णय
स्विस एअरलाइन्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही दिल्लीतील LX147 विमानाशी संबंधित घटनेबाबत अवगत आहोत. या विमानात २२८ प्रवासी आणि ४ लहान मुले (infants) होती. विमानाने वेग घेतल्यानंतर इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. वैमानिकांनी वेळीच उड्डाण थांबवले आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून विमान रिकामे करण्याचा निर्णय घेतला. सहा प्रवाशांवर सध्या उपचार सुरू असून विमानावरील कर्मचारी सुरक्षित आहेत.”
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. एअरलाइन्सने स्पष्ट केले की, जे प्रवासी स्लाइड्स वापरू शकत नव्हते त्यांच्यासाठी शिडीची (Stairs) व्यवस्था करण्यात आली होती. सध्या प्रवाशांना मदत केली जात असून, त्यांच्यासाठी हॉटेल निवास किंवा पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचे काम स्थानिक पथके युद्धपातळीवर करत आहेत.
स्विस एअरलाइन्सने पुढे म्हटले की, “ही परिस्थिती सर्वांसाठीच तणावपूर्ण आहे. आमचे तांत्रिक तज्ज्ञ या घटनेच्या सखोल तपासासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
