Swiss woman Sandra leaves corporate job in Dubai to start a free school in India: आलिशान जीवनशैली, उंची राहणीमान मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहींना सुखनैव आयुष्य जगण्याचे भाग्य लाभते. तर काही जण सुखाचा मार्ग साडून खडतर पण आत्मिक समाधान देणारा मार्ग निवडतात. असे व्रतस्थ लोक हल्ली कमी संख्येने आढळतात. भारतात सध्या स्वित्झर्लंडमधील सँड्रा लावी गोजकोविच अशाच व्रतस्थ व्यक्तिमत्वापैकी एक आहेत. १५ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या सँड्रा यांनी यशस्वी कॉर्पोरेट कारकीर्द, आर्थिक सुबत्ता आणि स्वित्झर्लंड, तसेच दुबईतील सुखनैव आयुष्य मागे सोडले आणि भारतात जीवनाचा खरा उद्देश शोधला.

झुरिचमधील बालपण ते भारताचा प्रवास

झुरिचसारख्या जगातील सर्वात श्रीमंत शहरात सँड्रा मोठ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली. या प्रवासात जगातील विषमता त्यांना अस्वस्थ करत होती. मोठे झाल्यावर जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी पैसा कमवला तेव्हाही त्यांच्या मनात हाच प्रश्न घोळत होता. ‘माझ्याकडे इतके काही आहे, ते इतरांकडेही का नाही?’, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून त्या अस्वस्थ व्हायच्या. ही अस्वस्थता त्यांना भारतात घेऊन आली.

१५ वर्षांपूर्वी सँड्रा यांनी दुबईतील गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. कोणतीही योजना न आखता दोन जोडी कपड्यांसह त्या भारतात आल्या. “माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदाच स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. माझ्याकडे आता फारसे काहीच नव्हते, तरीही मी श्रीमंत असल्याची भावना मनात होती”, अशी प्रतिक्रिया सँड्रा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

Swiss woman free school India
सँड्रा यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पौष्टिक जेवणही देण्यात येते. (Photo – Insta / sandralavie)

संघर्षाचे दिवस

सुरुवातीच्या काळात त्यांना भारतात अनेक धक्के बसले. विमानतळावर फसवणूक झाली. सांस्कृतिक धक्क्याचा अनुभव घ्यावा लागला. पैशांच्या अभावी अतिशय साध्यासुध्या निवासस्थानी मुक्काम करावा लागला. स्वित्झर्लंड आणि दुबईत घालवलेल्या आयुष्यापेक्षा हे पूर्णपणे वेगळे होते.

पण त्याचवेळी अनोळखी भारतीयांनी दिलेल्या निखळ प्रेमाने त्या भारावून गेल्या. विविध एनजीओंबरोबर काम करताना त्यांना लक्षात आले की, पैशांचा वापर योग्य ठिकाणी होत नाही. यावर उपाय शोधण्यासाठी पश्चिम बंगालच्या एका अतिदुर्गम बेटावर जाऊन त्यांनी तळागाळातील लोकांशी संवाद साधला. इथूनच त्यांनी वंचित घटकातील मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली.

पश्चिम बंगालच्या सागर बेटावर आहे शाळा

इतर एनजीओंमध्ये काम करत असताना आर्थिक गैरव्यवस्थापन, समाजाच्या खऱ्या गरजांकडे दुर्लक्ष करणारे प्रकल्प पाहून शाश्वत असे काहीतरी करावे, असा विचार सँड्रा यांच्या मनात होता. अखेरीस त्यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गम गाव निवडले. अडीच तासांचा रेल्वे प्रवास त्यानंतर एका तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर त्या सागर नावाच्या दुर्गम बेटावर पोहोचल्या. या गावातील ग्रामस्थांचा विश्वास संपादन केल्यानंतर येथील मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली.

पण हे काम सोपे नव्हते, याची जाणीव त्यांना होती. विश्वास मागून मिळत नाही. तर तो कमवावा लागतो. अनेक महिने लोकांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर नाव नोंदवणूही अनेक मुले अनुपस्थित राहत असत. सँड्रा स्वतः आणि त्यांच्या शाळेतील शिक्षक रोज सकाळी मुलांच्या घरोघरी जाऊन शाळेत येण्यासाठी विनंती करत.

हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला. या शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षण, पौष्टिक जेवण आणि त्यांच्या भविष्याबद्दलची काळजी घेतली जात असल्याचे त्यांना पटले. एकेकाळी नकार देणारे पालक आता रांग लावून आपल्या मुलांना शाळेत घालतात. हा विश्वास केवळ आश्वासनाने नाही तर आम्ही सातत्याने केलेल्या कामामुळे निर्माण झाल्याचे सँड्रा यांनी सांगितले.

१५ वर्षांत हजारो मुलांना शिक्षण दिले

या १५ वर्षांच्या काळात या मोफत शाळेच्या माध्यमातून हजारो मुलांना शिक्षण देण्यात आले. आसपासच्या ३० गावांमधील २० हजारांहून अधिक मुलांपर्यंत हा प्रकल्प पोहोचला आहे. सर्वात जमेची बाजू म्हणजे या शाळेतून शिकलेली मुलेच आता शिक्षक म्हणून काम करत आहेत. सँड्रा यांच्यासाठी हेच या शाळेचे यश आहे.

सनातन धर्माचा प्रभाव

सँड्रा पुढे म्हणाल्या, आज या शाळेचा प्रभाव केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही. बालविवाह, मानवी तस्करी आणि कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी येथील विद्यार्थी पुढाकार घेतात.

स्वित्झर्लंडने मला शिस्त शिकवली तर भारताने मला आतून घडवले. भारताने मला नम्रता आणि परिस्थितीचा स्वीकार करण्यास शिकवले. सनातन धर्माच्या तत्त्वज्ञानाचा माझ्यावर खोल प्रभाव पडला, असेही त्या सांगतात.