गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून एक नवा पॅटर्न वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील तीन आठवड्यांमध्ये दहशतवाद्यांनी दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांना लक्ष्य केलेय. यावेळी दहशतवाद्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबियांना धमकाविण्याचे आणि घरातील वस्तुंची तोडफोड करण्यात आली होती. तसेच तुमची पोलिसातील नोकरी सोडा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा संदेशही प्रत्येकवेळी या दहशवाद्यांकडून देण्यात आला आहे. अशा घटनांमुळे पोलीस अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे येथील अधिकारी आपल्या कुटुंबियांना सावध आणि काळजी घेण्यास बजावत आहेत.

आमच्यासाठी हा प्रकार नवीन असून ही चिंतेची बाब आहे. मी माझ्या पालकांना रात्र झाल्यानंतर दार उघडू नका, असे सांगून ठेवले आहे. तसेच कोणताही समस्या उद्भवल्यास मी त्यांना महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवले आहेत, असे उत्तर काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी केली होती. यावेळी त्यांनी घरातील सामानाची नासधूस केली. तसेच तेथून पळ काढताना हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या होत्या. अतिरिक्त अधिक्षक पदावर असणाऱ्या या अधिकाऱ्याची नुकतीच उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात बदली झाली होती. यापूर्वी शोपियान जिल्ह्यातील रियाझ अहमद आणि दिलबर अहमद यांच्या घरांनाही दहशतवाद्यांकडून अशाचप्रकारे लक्ष्य करण्यात आले होते.

गेल्यावर्षी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारावेळी आंदोलकांना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फलक झळकविण्यात आले होते. या फलकांवर आंदोलकांविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला होता. याशिवाय, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी झाकीर रशिद भट यानेदेखील व्हिडिओद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला तर तुमच्यावर हल्ला करू, असे झाकीरने व्हिडिओत म्हटले होते. तुम्ही आमच्या कुटुंबियांना या सगळ्यात ओढून मोठी चूक करत आहात. आमच्या कुटुंबियांना किंचितही धक्का लावला तर तुमच्या कुटुंबालाही आम्ही सोडणार नाही. तुमचे कुटुंब जम्मूत असल्यामुळे ते सुरक्षित आहे, असं तुम्हाला वाटतं. मात्र, ते कन्याकुमारीत राहत असतील तरी त्याठिकाणी जाऊन त्यांना मारण्याची ताकद आमच्यात आहे, असे भट यांनी म्हटले.