Who are Naveed Akram and Sajid Akram: रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर दोन हल्लेखोरांनी एक हजारांहून जास्त संख्येनं जमलेल्या समुदायावर भीषण हल्ला केला. या दोघांनी बरोबर आणलेल्या ऑटोमॅटिक रायफल्समधून समोर जमलेल्या जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. शेकडो लोक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख जाहीर केली असून त्यानुसार एक हल्लेखोर २४ वर्षीय नवीद अक्रम तर दुसरा हल्लेखोर नवीदचाच ५० वर्षीय पिता साजिद अक्रम होता. यापैकी साजिदचा घटनास्थळीच पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला असून नवीदला पोलिसांनी अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं बोंडी बीचवर?

रविवारी संध्याकाळी बोंडी बीचवर मोठ्या संख्येनं ज्यू नागरिक जमा झाले होते. बीचजवळच्या पार्कमध्ये ज्यू समुदायासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘हनुका’चा पहिला दिवस साजरा करण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं ज्यू नागरिक एकत्र आले होते. संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवीद अक्रम व साजिद अक्रम बीच परिसरात दाखल झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व इतर प्रत्यक्षदर्शींनी काढलेले व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. त्यानुसार हे दोघे पिता-पुत्र बोंडी बीचवर दाखल झाले व एका छोट्या पुलावर चढून दोघांनी समोर जमलेल्या ज्यू समुदायावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी हल्ल्यासाठी तब्बल ६ बंदुका बरोबर आणल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व्हायरल झालेल्या फूटेजमध्ये हल्लेखोरांपैकी एका हल्लेखोराने मध्येच गोळीबार थांबवून जमलेल्या लोकांना पांगवण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या दोघा हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या मानसिकतेमध्ये हा हल्ला केला? याचा तपास सध्या ऑस्ट्रेलियन पोलीस करत आहेत.

bondi beach firing
सिडनीच्या बोंडी बीचवर झालेल्या गोळीबारात मोठ्या संख्येनं नागरिक जखमी झाले आहेत (फोटो – एपी)

दरम्यान, पोलिसांनी नवीद अक्रम व साजिद अक्रम यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या गोळीबारात ५० वर्षीय साजिद अक्रमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पण नावीद अक्रमला जखमी अवस्थेत पण जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. नाविदवर सध्या रुग्णालयात उपचार चालू असून त्याच्याकडून पोलिसांना या हल्ल्यामागच्या कारणाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

बोंडी बीच हल्ल्याचा Viral Video

कोण आहेत अक्रम पिता-पुत्र?

इंडियन एक्स्प्रेसनं सिडने मॉर्निंग हेराल्डच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार न्यू साऊथ वेल्स अर्थात NSW चे पोलीस आयुक्त मॉल लेनयॉन यांनी हा ज्यू समुदायावर हेतुपुरस्सर केलेला हल्ला असल्याचं नमूद केलं आहे. लेनयॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी ५० वर्षीय साजिद अक्रम याच्याकडे हत्यारं बाळगण्याचा परवाना होता. त्यानं घटनास्थळी एकून ६ नोंदणीकृत बंदुका आणल्या होत्या. हल्लेखोरांपैकी एका व्यक्तीची ओळख एनएसडब्ल्यू पोलिसांना आधीपासून होती. पण असा कुठला हल्ला नियोजित केला जात असल्याची कोणतीही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली नव्हती.

साजिदचा मुलगा नवीद अक्रम हा बांधकाम कारागीर होता. पण नुकतीच त्याची नोकरी गेली होती. रविवारी सकाळी नावीद अक्रम घराबाहेर पडला, तेव्हा त्यानं घरच्यांना सुट्टी असल्याने मासेमारीचा आनंद घेण्यासाठी जात आहे, असं सांगितलं होतं. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने नवीदच्या बोनीरिग येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. याशिवाय, कॅम्पसी परिसरात एक भाड्याचं घर घेऊन हे दोघे पिता-पुत्र गेल्या काही काळापासून वास्तव्य करत होते. या घराचीही पोलिसांनी झडती घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं बोंडी बीच हल्ल्यावर निवेदन

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बोंडी बीचवरील हल्ल्यावर निवेदन जारी केलं असून घडलेल्या प्रकाराचा आपल्याला धक्का बसल्याचं नमूद केलं आहे. प्रशासन नागरिकांना सर्वतोपरी मदत करत असून एनएसडब्ल्यू पोलीस घटनेची सखोल चौकशी करत असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.