भारत-पाकिस्तान सामन्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारला टोला; राऊत म्हणाले, “क्रिकेट खेळून…”

राऊत यांनी काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीचा संदर्भ दिला.

Raut Modi
प्रसारमाध्यमांशी बोलताना केली टीका

भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की तो क्रिकेटपेक्षाही बराच मोठा विषय असतो. त्यातच आता या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील टी २० विश्वचषकामधील सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामने खेळू नये अशी भूमिका घेत एकेकाळी थेट मैदानावर उतरुन खेळपट्टीची नासधुस करण्याचा इतिहास असणाऱ्या शिवसेनेकडून आलेली प्रतिक्रिया ही या वर्षीच्या सामन्यासंदर्भातील पहिली राजकीय प्रतिक्रिया ठरलीय.

भारत पाकिस्तान सामने व्हायला हवेत का यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. “यावर आम्ही बोलणार नाही, रोज लोक मरतायत, केंद्र सरकारनं याबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलंय. “क्रिकेट खेळून, बंद करून काश्मीरची परिस्थिती बदलणार आहे का?,” असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच “पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका. तुम्ही तिकडे जाऊन केक कापता,” असा टोलाही राऊत यांनी मोदींनी काही वर्षांपूर्वी अचानक तत्कालीन पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिलेल्या भेटीच्या संदर्भाने लगावला.

ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा…
“काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथं अनेक निर्बंध होते. गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी. ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा, फार पावरफुल लोक आहेत,” असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना लगावला.

जम्मू-काश्मीरवरुनही साधला निशाणा…
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल भाष्य करताना तिथं पुन्हा एकदा दहशतवाद सुरु झाला आहे अशी टीका राऊत यांनी केलीय. “सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे की ३७० कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोक मारली जात आहे,” असं राऊत म्हणालेत. तसेच पुढे बोलताना, “चीन पण लडाख, तवांगमध्ये घुसखोरी करत आहे,” असंही राऊत म्हणालेत. या दोन्ही देशांविरोधात गृहमंत्रालयाने आपली जबाबदारी ओळखून योग्य ती कारवाई करावी असंही राऊत म्हणाले आहेत.

२४ ला भारत पाक सामना, आकडेवारी काय सांगते पाहा…
ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान शेवटचा टी २० सामना २०१६ मध्ये टी २० विश्वचषकादरम्यान खेळवण्यात आला होता. कोलकात्यामध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आतापर्यंत टी २० विश्वचषकामध्ये पाच वेळा आमने-सामने आलेत. हे पाचही सामने भारताने जिंकलेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ८ टी-२० सामने झाले असून त्यापैकी ७ भारताने जिंकलेत. पाकिस्ताने केवळ एकदाच भारताला पराभूत केलंय. पाकिस्तानला मिळालेला हा एकमेव विजय डिसेंबर २०१२ रोजी बेंगळुरुमधील मैदानात खेळताना मिळाला होता. पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी २० असं सर्व काही गृहित धरल्यास आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये १७ सामने झाले असून त्यापैकी १४ सामने भारताने जिंकलेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T 20 world cup shivsena mp sanjay raut on india vs pakistan match scsg

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या