टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा मानहानीकारक पराभव केल्यानंतर श्रीनगरमध्ये काही वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या या विद्यार्थ्यांविरोधात काहीजणांनी तक्रारदेखील दिली आहे. दरम्यान दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंटने (युएलएफ) या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यांना धमकी दिली असून पुढील ४८ तासात माफी मागण्यास सांगितलं आहे.

पोलिसांकडे तक्रार कोणी केली आहे याची आम्हाला कल्पना असून पुढील ४८ तासात माफी मागा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्यास तयार व्हा असं युनायटेड लिबरेशन फ्रंटने धमकावलं आहे.

“पोलिसांकडे जाऊन एफआयआर दाखल करणारे कोण आहेत याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. गैरस्थानिक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या अशा गोष्टींमध्ये पडू नये,” असा इशारा दहशतवाद्यांनी दिला आहे. महिन्याच्या सुरुवातीला युएलएफने दक्षिण काश्मीरमध्ये स्थलांतरित कामगारांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर खोऱ्यात अनेक ठिकाणी सेलिब्रेशन झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेही फोडण्यात आले होते. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांविरोधात जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. याशिवाय सांबा जिल्ह्यातून सहा जणांना ताब्यात घेतलं होतं.

विद्यार्थी संघटनेने यासंबंधी राज्यपालांना माणुसकीच्या आधारे या विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंदर राणा यांनी सेलिब्रेशन कऱणाऱ्या या विद्यार्थ्यांना देशाविरोधात कट रचल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं पाहिजे असं म्हटलं आहे.