scorecardresearch

शुभारंभाच्याच दिवशी ताडोबा हाऊसफुल्ल; टी- १०० वाघाने दिलं पर्यटकांना दर्शन

आज पहिल्याच दिवशी ताडोबाच्या सहाही प्रवेशद्वारावरून ९२ जिप्सी, तीन कॅन्टरना प्रवेश देण्यात आला होता.

शुभारंभाच्याच दिवशी ताडोबा हाऊसफुल्ल; टी- १०० वाघाने दिलं पर्यटकांना दर्शन
पहिल्याच दिवशी ताडोबा हाऊसफुल्ल

करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला लॉकडाऊन व त्यानंतर पावसाळा अशा मोठ्या विश्रांतीनंतर, जवळपास सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आज म्हणजेच १ ऑक्टोबरपासून व्याघ्र व वन पर्यटनासाठी सुरू झाला आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्याच दिवशी ताडोबा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. यावेळी, ताडोबाच्या सहाही प्रवेशद्वारावरून ९२ जिप्सी, तीन कॅन्टरना प्रवेश देण्यात आला होता. याचवेळी ताडोबातील टी- १०० वाघाने दर्शन दिल्याने पर्यटकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण होतं.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हमखास व्याघ्रदर्शनासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक ताडोबात पर्यटनासाठी येत असतात. पावसाच्या प्रदिर्घ सुट्ट्यांनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा सुरू झालं आहे. त्यामुळे, आज पहिल्याच दिवसासाठी ताडोबाची ऑनलाईन बुकींग हाऊसफुल्ल होती. ताडोबाच्या सहा प्रवेशद्वारांवरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला होता. तर, संध्याकाळच्या फेरीत ५१ जिप्सी व २ कॅन्टरना प्रवेश देण्यात आला होता. यावेळी पुणे, मुंबई, बेंगळूर येथून पर्यटक ताडोबात व्याघ्र पर्यटनासाठी दाखल झाले होते.

पुढील महिनाभरही ऑनलाईन बुकींग हाऊसफुल्ल

ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशद्वारावरून गेलेल्या पर्यटकांना यावेळी चक्क टी- १०० वाघाने दर्शन दिल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दरम्यान, पुढील महिनाभर देखील ताडोबाचे ऑनलाईन बुकींग हाऊसफुल्ल झालं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी आता नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमांचं पालन करूनच ताडोबात सफारी करता येणार आहे.

सर्व पर्यटकांचं गुलाब पुष्गुच्छ देऊन स्वागत

पहिल्याच दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने जिप्सी चालक, गाईड तथा ताडोबा पर्यटनाच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांनीच पर्यटन सुरू झाल्याचा आनंद ‘लोकसत्ता’शी बोलतां’ना व्यक्त केला. ताडोबात प्रवेश केलेल्या सर्व पर्यटकांचं गुलाब पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tadoba housefull on first day of launch t 100 tiger tourists gst

ताज्या बातम्या