वॉशिंग्टन : पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा हा २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या कटात सामील होता.  त्याला ताब्यात देण्याची भारताची विनंती मान्य करून त्याचे प्रत्यार्पण करावे, अशी भूमिका बायडेन प्रशासनाने लॉस एंजलिसच्या संघराज्य न्यायालयात स्पष्ट केली आहे.

राणा हा आता ५९ वर्षांचा असून त्याला भारताने फरारी घोषित केले आहे. त्याच्यावर २००८ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी अनेक आरोप आहेत. त्या हल्ल्यात सहा अमेरिकनांसह १६६ जण ठार झाले होते. त्याला १० जून २०२० रोजी लॉस एंजलिस येथे अटक करण्यात आली होती. त्याला ताब्यात देण्याची मागणी भारताने केली होती. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करताना असे सांगण्यात आले की,  प्रत्यार्पणाचे सर्व निकष पूर्ण होत असून न्यायालयाने राणा याला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी द्यावी. भारताने दिलेल्या पुराव्याआधारे असे सांगण्यात आले की, राणा याने काही बनावट कागदपत्रे तयार केली होती. राणा हा  भारताला हवा असून त्याच्याविरोधात ऑगस्ट २०१८ मध्ये अटक वॉरंट जारी केले होते.

भारतीय अधिकाऱ्यानी म्हटले आहे की, राणा हा लष्कर ए तयबाचा दहशतवादी डेव्हीड कोलमन हेडली याचा बालपणीचा सहकारी असून त्याने २००८ मध्ये मुंबई हल्ल्याचा कट करण्यात  महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.