Tahir Hussain Ankit Sharma Murder Case: गुप्तचर अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आम आदमी पार्टीच्या माजी नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी हुसेनला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने शिक्षा सुनावताना, “गुन्ह्याची पद्धत अत्यंत क्रूर होती,” असे म्हटले आहे.

शिक्षा सुनावताना न्यायाधीश काय म्हणाले?

शिक्षा सुनावताना न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. तसेच, या घटनेमुळे समाजाला देखील धक्का बसला आहे. हत्येचा हा गंभीर प्रकार आणि त्यानंतर ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यामुळे आता समाजास देखील आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह म्हणाले. “मृतदेहाला जनावरासारखे फरफटत नेऊन गटारात फेकून देण्यात आले होते,” असे न्यायाधीश म्हणाले. गुन्ह्याचा प्रकार अत्यंत क्रूर असल्याचे स्पष्ट करताना यातील सर्व दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सर्व दोषींना जन्मठेप

गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ताहीर हुसेनसह इतर दोषींना देखील जन्मठेप सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली दंगलीदरम्यान शर्मा यांचा मृतदेह गटारात आढळून आला होता. या हत्येमुळे दिल्लीसह देशात खळबळ निर्माण झाली होती. संतप्त जमावाने शर्मा यांची हत्या केल्याचा युक्तिवाद सुरुवातीला करण्यात आला होता. तसेच, ताहीर हुसेनने हत्येप्रकरणी करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने या प्रकरणातील सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

ताहिरला खून आणि दंगल घडवणे यासह इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी, अंकित चांद बाग येथील आपल्या घरातून घरगुती सामान आणण्यासाठी बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले. जमावाने त्यांची हत्या करून, मृतदेह नाल्यात फेकून दिला, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यांना ५१ वेळा चाकूने भोसकण्यात आले होते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

वडिलांची दिली होती तक्रार

अंकित यांचे वडील रवींद्र कुमार यांच्या तक्रारीवरून २६ फेब्रुवारी २०२० रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. तक्रारीत ताहिरवर आरोप करण्यात आले होते. त्याच्याशी निगडीत दंगलखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता.