Taiwan election anti India banner Xenophobia: तैवानमध्ये स्थानिक निवडणुकीतील एका उमेदवाराने भारतविरोधी बॅनरबाजी केली आहे. दक्षिण तैवानमध्ये स्थानिक निवडणुकीत एका उमेदवाराने प्रचारासाठी एक फलक लावला आहे. या फलकावर वर्तुळात भारतीय ध्वज आणि एक पगडी घातलेल्या व्यक्तीवर क्रॉस लाईन मारण्यात आली आहे. हा वादग्रस्त फलक आता ऑनलाईन व्हायरल झाला असून, वांशिक भेदभाव केल्याप्रकरणी या उमेदवारावर टीका केली जात आहे.
तैवान-भारतात सामंजस्य करार
तैवान आणि भारतात २०२४ मध्ये एक सामंजस्य करार झाला होता. या कराराअंतर्गत तैवानमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांना कामास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या करारामुळे तैवानच्या काही भागातून टीका करण्यात आली. देशातील प्रमुख विरोधी पक्ष चिनी राष्ट्रीय पार्टीने याला कडाडून विरोध दर्शवला होता. महिला सुरक्षेचा मुद्दा या पक्षाने उपस्थित केला होता.
वादग्रस्त होर्डिंग
तैवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सी आणि तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, काओशिउंग शहरातील सियाओगांग जिल्ह्यातील वॉर्डन आणि आगामी नगर परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार ली हंग-यी यांनी मतदारसंघात एक होर्डिंग लावला आहे. या होर्डिंगवर भारतीय राष्ट्रध्वजावर ‘नो’चे चिन्ह आणि डोक्यावर फेटा घातलेल्या माणसाचे चित्र आहे. भारतातून स्थलांतरित कामगारांची भरती करण्याच्या तैवानच्या योजनेला विरोध असल्याचा संदेश ली यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून दिला आहे. हा फलक ऑनलाईन व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवला.
होर्डिंगबाबत टीका
तैवानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय नागरिकाने या फलकावर टीका करताना हा प्रकार म्हणजे उघड वांशिक भेदभाव असल्याचे मत त्यांनी मांडले. स्थलांतरित कामगारांना विरोध नाही, परंतु विशेषतः भारतातून कामगारांना प्रवेश देण्याच्या तैवानच्या योजनेला विरोध आहे, असे मत ली यांनी गेल्या आठवड्यात सीएनएशी बोलताना सांगितले. या धोरणात उपाययोजना आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे ली म्हणाले. दरम्यान, या फलकावर स्थानिक राजकीय नेत्यांनीही टीका केली.
भारतीय कामगारांच्या भरतीसाठी करार
तैवानमध्ये प्रमुख क्षेत्रांत कामगारांचा तुटवडा आहे. या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी तैवान भारतातून कामगारांची भरती करण्याच्या योजनांवर काम करत आहे. याचाच भाग म्हणून कृषी आणि सेवा क्षेत्रात भारतीय कामगारांच्या भरतीसाठी तैवान आणि भारताने २०२४ मध्ये स्थलांतरित कामगार सहकार्याबाबत एका सामंजस्य करार झाला होता. दरम्यान, हा विषय आणि बॅनर जुना असल्याचा दावा तैवान आणि चीन विषयाच्या अभ्यासिका सना हाश्मी यांनी म्हटले आहे. हे प्रकरण ज्यावेळी उघडकीस आले त्यावेळी सर्वांनीच याचा निषेध केला तसेच, स्थानिक निवडणुकांमध्ये यासह विविध विषयांचे राजकारण केले जात असल्याचे हाश्मी यांनी स्पष्ट केले.
